बार्शी : नमाज पठणाची वेळ वाढवावी या कारणांवरुन बाचाबाची होऊन, त्याचे पर्यावसान काठी, दगड, कोयत्याने मारामारी होण्यात झाले.
यशोधरा हॉस्पिटल सोलापूर येथून फारुख रज्जाक सौदागर (वय २८), रा. मंगळवार पेठ, बार्शी याने पोलीसांना दिलेल्या जबाबानुसार,
बार्शीतील मंगळवार पेठेतील नुरी मशीद येथे नमाज पठण व रमजानचा उपवास सोडण्यासाठी दि. ४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी पांचचे सुमारास मी व समाजातील अन्य लोक जमलो होतो. त्यावेळी वहाब ईस्माईल सौदागर व आयाज ईस्माईल सौदागर यांनी नमाज पठण करायची वेळ वाढवा असे म्हणाल्यावरुन मशीदचे ट्रस्टी फरीद खलील सौदागर व माझ्या सोबत शिवीगाळी व बाचाबाची झाली.
त्यानंतर रात्री दहा वाजता मशीदीत झालेली तक्रार मिटविण्यासाठी मी, जुबेर महेताब सौदागर व सद्दाम फरीद सौदागर असे आम्ही तिघेजण आयाज सौदागर यांचे घराकडे जात असताना, आयाज हा विठ्ठल परदेशी यांचे घराचे समोर रोडवर थांबलेला दिसल्याने, आम्ही त्याचेजवळ जाऊन म्हणालो की, रमजानचा पवित्र महीना चालू आहे. उगाच आपल्या आपल्यात भांडण, तक्रारी नको आपण मिटवून टाकू.
आम्ही असे म्हणत असतानाच आयाज सौदागर याने भाऊ, पुतणे व नातेवाईकांना हाका मारुन बोलावले. लवकर या फारुख आयता आला आहे, याला आता संपवूनच टाकू. असे म्हणताच वहाब ईस्माईल सौदागर आणि रेहान फयान सौदागर काठी घेऊन, मुस्तकीन आयाज सौदागर, फरहान रियाज सौदागर, सर्फराज वहाब सौदागर हे दगड घेऊन, तर शहानवाज वहाब सौदागर कोयता घेऊन आले.
आता तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून मला काठीने, दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आयाज सौदागर याने शहानवाज सौदागर याचेकडून कोयता घेवून माझ्या डोक्यात मारले. मी खाली पडल्यानंतर देखील त्यांनी मला लाथाबुक्यानी व काठ्यांनी मारले. माझ्यासोबत असलेले जुबेर सौदागर व सद्दाम सौदागर हे सोडविण्यासाठी मध्ये पडले असता, त्यांना देखील लाथाबुक्याने मारहाण केली.
माझ्या डोक्यातून रक्त येत असल्याने मी चक्कर येवून खाली पडलो. त्यानंतर माझा भाऊ अब्दुलकादीर फरीद सौदागर याने मला उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे नेले होते व तेथून रेफर केल्याने मला पुढील उपचाराकरीता यशोधरा हॉस्पिटल, सोलापूर येथे आणून दाखल केले आहे.
फारुख सौदागर याच्या तक्रारीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात वरील सात जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. जे. कर्णेवाड करत आहेत.
