वर्षापूर्वी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली; बरोबर वर्षाने वडिलांनी औषध प्राशन करून संपवला जीवनप्रवास –
करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील देवळाली येथे एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याचा प्रकार घडला आहे. जगन्नाथ कृष्णा बिचितकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे समजत आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मुलाने गेल्यावर्षी १८ जुनलाच पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर बरोबर एक वर्षानेच वडिलांनी आत्महत्या केली असल्याचा प्रकार घडल्याने देवळाली हादरले आहे.


आत्महत्या केलेले बिचितकर हे शेतात राहत होते. त्यांनी शुक्रवारी विषारी औषध केले असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. कर्जबाजारी झाल्यामुळे मुलाने आत्महत्या केली होती. अशी चर्चा आहे. पुण्यात गळफास लावून त्याने आत्महत्या केली होती.
शुक्रवारी साडेपाच- सहा वाजताच्या सुमारास वडिलांनी औषध प्राशन केले असल्याचे समोर आले. जवळील शेतात काम करत असलेल्या महिलांच्या लक्षात हा प्रकार आला असे समजत आहे. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र तेथून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.