
चिंताजनक: देशात चोवीस तासात सापडले 24248 कोरोना रुग्ण; 425 जणांचा मृत्यू
ग्लोबल न्यूज- देशात काही दिवसांपासून दररोज 20 हजाराहून अधिक कोरोनाबाधित सापडत असून गेल्या 24 तासांत 24,248 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 425 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारत रशियाला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहोचला असून देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 6,97,413 इतकी झाली आहे. दरम्यान, भारतात आज सकाळी 11 पर्यंत एक कोटींहून अधिक कोरोनाच्या टेस्ट झाल्याचे आयसीएमआरने सांगितले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण 6,97,413 कोरोना बाधितांपैकी 2,53,287 सक्रिय रुग्ण आहेत. तर 4, 24, 433 जण कोरेनामुक्त झाले आहेत. देशात मागील 24 तासांत 425 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या 19 हजार 693 झाली आहे.
देशात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 60 टक्क्यांहून जास्त झाले आहे. 7 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश असे आहेत, जिथं 75 टक्क्यांहून जास्त रुग्ण निरोगी झाले आहेत. 4 राज्यांत तर 80 टक्क्यांहून जास्त रुग्ण निरोगी झाले आहे. यात चंदीगड सर्वांत अव्वल आहे.

महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगण, कर्नाटक, आसाम आणि बिहार या राज्यांत रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, 5 जुलैपर्यंत 99,69,662 लोकांची चाचणी करण्यात आली होती. परंतु, आज सकाळी 11 पर्यंत भारताने एक कोटी चाचण्या पूर्ण केल्या आहेत. आयसीएमआरने ही माहिती जाहीर केली आहे.
कोरोनाच्या आकडेवारीत भारताने रशियाला देखील मागे टाकले आहे. भारत त्या टॉप तीन देशात आहे जेथे कोरोनाचे संक्रमण सर्वाधिक आहे. अमेरिका, ब्राझील पाठोपाठ भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
