आभासी प्रेम…..”मी सुद्धा तुझ्या प्रेमात पडले आहे”
एका व्हाटस् एप गृपवर होती ती दोघे.त्याची शेरोशायरी आवडायची तिला.एकदा तिचा पर्सनल मेसेज आला त्याला.

“मला पीसीला पाठवत जा ना तुमची शायरी.मला खूप आवडते.” तो मोहरला आणि सावरलाही.
“अहो ..ती बहुतांशी फोरवर्डेड असते मैम.”
“असू द्या. तुम्हाला त्रास देते थोडा.पण पाठवत जा प्लीज.”
“त्रास कसला मैम.पाठवत जाईन”
त्याने आठवणीने तिला शेरोशायरी पाठवायला सुरूवात केली.बहुतेकदा प्रेमाची.तिचेही रिप्लाय येत गेले.एक नाते हळूहळू फुलत गेले दोघांमध्ये.आता दोघांनी एकमेकांना एकेरी नावाने संबोधणे सुरू केले.चैटींगही होऊ लागली.. अगदी खाजगी जीवनावरही.
एकदा त्याने भीडभाड न ठेवता लिहले.
” I LOVE YOU”
आणि समोरून तिचाही रिप्लाय आला.
“मी सुद्धा तुझ्या प्रेमात पडले आहे”
आता एकदम मनमोकळे चैटींग सुरू झाले.त्याला आता उस्फुर्त काव्य सुचू लागले. तीही थोडीफार कवीता करू लागली. एकदा तो म्हणाला “आता आपल्या नात्याबद्दल पुढे काय करायचे ? ठरवले आहे का तू?”
ती म्हणाली “जे आहे जसे आहे तेच बरे आहे.तूला बायका मुले आणि मलाही नवरा आहे ..मुलगी आहे.वयाची चाळीशी पार आपण दोघांनीही केलेली आहे.भेटून काय करणार? मिठी मारू, चुंबने घेऊ,फारतर सेक्स करू.नंतर जोडीदाराशी प्रतारणा केली म्हणून आयुष्यभर फार गिल्टी फिलींग होत राहील.कशाला उगाच? आहे ते छानच.हे चालू ठेऊ.तुझे मत काय?”
” अगदी बरोबर. आपण एकमेकांना भेटायला नकोच.भेटलो असतो तर माझा पुरूषी अहंकार सुखावला असता.आणि नंतर नसते फाटे फुटले असते.आपले प्रेम असेच निर्व्याज्य राहायला हवे.”
या निर्णयामुळे दोघेही एकमेकांवर अधीकच प्रेम करू लागले.व्यक्त करण्याचे साधन फक्त मोबाईल चॕटींग. काळ पुढे जात असतो.अचानक तिच्या लक्षात आले की तो हल्ली बराच कमी असतो मोबाईलवर.त्याला विचारल्यावर त्याने सांगितले की कंपनीचे काम वाढले आहे खूप ..वेळ मिळत नाही.ती उदास झाली.काही दिवसानंतर तर चैटींग बंदच झाली.तो दिसलाच नाही.रिप्लायही नाही.तिला वाईट वाटले पण त्याच्यावर तिचा हक्क थोडाच होता?
एकदा त्याने सकाळीच तिला मेसेज केला
“होऊ दे कितीही वेळ
मी तुझी वाट पाहीन
मृत्यूनंतरही मी
फक्त तुझाच राहीन”

तिचा रिप्लाय आलाच नाही. बीझी असेल म्हणून त्याने लक्ष दिले नाही. खरेतर बरेच दिवसात त्याचा मेसेज आल्यामुळे तिचा तातडीचा प्रतिसाद अपेक्षित होता.पण संध्याकाळ झाली तरी तिचा रिप्लाय आला नाही म्हणून त्याने पुन्हा मेसेज केला. “काय झाले? एनीथींग रॉंग?”
आता तिचा लगेच रिप्लाय आला
“मुर्ख माणसा,एकतर दिवसेंदिवस मेसेज करत नाही.आणि करतो तर असे? खरेतर मी बोलणारच नव्हती तुझ्याशी.पण काय करू? प्रेम करते ना? “
“अगं पण झालं काय?”
“काय झाले? मृत्यूचे मेसेज पाठवतो आणि विचारतो काय झाले?”
त्याने निश्वास सोडला. ” अगं ते ट ला ट आणि फ ला फ लावून केलेले काव्य आहे.त्यात काय एवढे?” “अजिबात नाही.यापुढे मृत्यूचा विषय पण नको.प्रोमीस दे मला.” “ok.दिले”
“दॕटस् लाईक ए गुड बॉय. स्वयंपाक बाकी आहे.रात्री मेसेज करते. गायब होऊ नकोस””नाही होणार. तुझी वाट पाहतो.” “चल ..बाय.”
रात्री खरेच तिचा मेसेज आला.
“विरहात जीवन हाच आपल्या प्रेमाचा लेखाजोखा
तरीही तुच विश्वास, उमेद तुच माझा खरा सखा.” .”छान.” “चल.दमलेयं रे आज, झोपते.गुडनाईट. आणि मी सांगितलेले लक्षात ठेव.”
“नक्की.गुडनाईट”
..
त्याने डोळ्यातले पाणी पुसले. थरथरत्या हाताने मोबाईल बंद केला.गेले कित्येक दिवस तो कॕन्सरशी झुंज देत होता.केमोथेरपी…रेडीओथेरपी करत असतांना बरेच दिवस तो तिच्याशी संपर्क करू शकला नाही.आणि तिला हे सांगायचेही नव्हते म्हणून त्याने कंपनीचे कारण पुढे केले होते. आत्यंतिक समाधानाने आणि थकव्याने त्याने डोळे मिटले. राउंडवर रात्री आलेल्या डॉक्टरांनी त्याला तपासले तेव्हा तो केव्हाच अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता. तिला दिलेले प्रॉमीस त्याने पाळले होते.तो यानंतर तिला कधीचं मृत्यूवरचा मेसेज पाठवणार नव्हता .
©विवेक चंद्रकांत वैद्य.नंदूरबार .