बार्शी : मौजे उपळे दु, ता. बार्शी या गावचे शिवारात जेसीबी मशीनच्या साह्याने ट्रॅक्टरमध्ये भोगावती नदीपात्रातील वाळू चोरुन भरुन नेण्यात येत आहे, असे बातमीदारा मार्फत समजल्यावरुन, दि. १७ एप्रिल २०२२ रात्री साडेआठचे सुमारास वैराग पोलिस तेथे गेले असता, एक जेसीबी मशीन भोगावती नदीच्या पात्रातील वाऴू उपसा करुन ट्र्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरत असल्याचे दिसले.
तेव्हा पोलिसांनी बिगर नंबरचा जेसीबी (अं.किंमत २७ लाख रुपये), बिगर नंबरचा ट्रॅक्टर (अं.किंमत ५ लाख रुपये), बिगर नंबरची दोन चाकी डंपींग ट्रॉली (अं.किंमत १ लाख ५० हजार रुपये), व एक ब्रास वाळू (अं.किंमत ७ हजार रुपये) असा एकूण ३३ लाख ५७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच महादेव शिवाजी बाकले (वय २५) रा.उपळे दुमाला, ता.बार्शी, राम फुलसिंग पवार (वय २९) रा. वेणीधरण ता. माहगाव जि.यमतमाळ आणि दादासाहेब शाहू मते, रा. झाडी, ता. बार्शी हे शासनाचा कोणताही परवाना न घेता व रॉयल्टी न भरता, जेसीबी मशीनच्या साह्याने चोरुन वाऴू उपसा करुन ट्रॅक्टरमध्ये भरुन घेवून जात असताना मिळून आले, म्हणून त्यांचेविरुध्द भा.दं.वि. कलम ३७९, पर्यावरण संरक्षण अधिनियम ९ व १५ प्रमाणे वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.