बार्शी : दि. २ एप्रिल २०२२ रोजी बार्शी तालुक्यातील वैराग येथे सचिन उर्फ पप्पू पवार याची हत्या केल्याच्या प्रकरणातील फरार आरोपींना वैराग पोलीसांनी गुजरात येथून ताब्यात घेतले आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून सदर आरोपी फरार झाले होते. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि महारुद्र परजणे करत असताना, आरोपी हे गुजरात राज्यात असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस अंमलदार रतन जाधव व अन्वर अत्तार यांनी आरोपीच्या मोबाईलचे विश्लेषण करुन आरोपींच्या गुजरात मधील ठिकाणाबाबत त्यांना माहिती दिली.
त्यावरुन सुरत, गुजरात सिटी काईम ब्रँचचे पोलीस उपनिरीक्षक पंडियार व पोलीस अंमलदार शब्बीर शेख यांना सदरची माहिती देण्यात आली. वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी सपोनि परजणे यांच्यासह पोलीस अमंलदार अमोल भोरे, अक्षय कांबळे, धनाजी रामगुडे, ब्रम्हदेव वाघमारे यांचे पथक तयार करुन, त्यांना तातडीने गुजरातकडे रवाना केले.

तेथे या पथकाने गुजरात पोलिसांसह मोहिम राबवून, आरोपी जुबेर आयुब शेख, मिथुन दादाराव सांळुखे, अखील याकुब शेख सर्व रा. वडवणी ता. वडवणी जि. बीड यांना शिताफीने ताब्यात घेतले.
सदर आरोपींना अटक करुन न्यायायालयात हजर केले असता दि. १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली. गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि महारुद्र परजणे हे करीत आहेत.