उत्तर प्रदेशमध्ये 8 पोलिसांना जीवे मारणारा मोस्ट वॉन्टेड आरोपी विकास दुबे याचा बॉडीगार्ड आणि राईट हॅन्ड अमर दुबे याचा पोलिसांसोबत झालेल्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. हमीरपूर जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत अमर मारला गेला. फरार विकास दुबे याच्या गँगमधील तो सर्वात खतरनाक गुंड मानला जायचा.

कानपुर देहात येथील बिकरू गावात 2 जुलै रोजी विकास दुबे याला पकडायला गेलेल्या पोलिसांच्या पथकावर दुबे आणि त्याच्या गँगने हल्ला चढवला. यात 8 पोलीस हुतात्मा झाले. तेव्हापासून विकास दुबे गँगसोबत फरार आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठी शोधमोहीम आखली आहे. सर्व आरोपींचे फोटो राज्यभर आणि शेजारील राज्यातील पोलिसांना पाठवण्यात आले आहेत.
अखेर बुधवारी पोलिसांना मोठे यश मिळाले. विकास दुबे याचा नातेवाईक असणारा आरोपी आणि 25 हजारांचे बक्षीस असलेला आरोपी अमर दुबे हमीरपूर जिल्ह्यात लपला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा अमर दुबे याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात अमर याचा खात्मा झाला, तर विकास दुबे याचे 3 ते 4 साथीदार यांना बेड्या ठोकण्यात यश आले. त्यांच्या कडून हत्यार जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती एसपी श्लोक कुमार यांनी दिली.

29 जूनला झाला होता विवाह

एन्काऊंटरमध्ये मारला गेलेला आरोपी अमर दुबे याचा गेल्या महिन्यात 29 जूनला विवाह झाला होता. विकास दुबे याचा नातेवाईक संजय दुबे याचा तो मुलगा आहे. अमर याचे काका आणि विकास दुबे याचे मामा प्रेम प्रकाश यांचा 3 जुलैला एन्काऊंटरमध्ये खात्मा झाला होता.
चौबेपूर शूटआऊटमध्ये सहभागी होता अमर
चकमकीत मारला गेलेला अमर दुबे हा गुंड विकास दुबेचा उजवा हात असल्याचे सांगितले जाते. तो चिकापूरच्या विक्रू गावातल्या झालेल्या शूटआऊटमध्ये सामील झाला होता आणि पोलिसांनीही त्याच्यावर 25 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना त्याला ठार मारायचे नव्हते, तर जिवंत पकडण्याची इच्छा होती. पण जेव्हा एसटीएफने त्याला शरण येण्यास सांगितले, तेव्हा त्याने गोळीबार सुरू केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला.

दुसरीकडे, मुख्य आरोपी विकास दुबे अद्यापही फरार आहे. त्याला त्याचा एन्काऊंटर होईल ही भीती सतावते आहे. तो आपल्या वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात आत्मसमर्पण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे शेवटचे ठिकाण फरीदाबादमध्ये सापडले, जेव्हा तो हॉटेलमध्ये राहण्यासाठी खोली घेण्यास आला होता. पण पोलीस येईपर्यंत तो निघून गेला. आता एसटीएफने फरीदाबाद येथून त्याच्या जवळच्या दोन साथीदारांची चौकशी सुरू केली आहे. तो हरियाणा किंवा दिल्ली कोर्टात शरण जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
