बार्शी : सामाईक शेतजमिनीच्या वाटणीवरुन दोन कुटुंबात झालेल्या वादात मारहाण केल्याची घटना बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे घडली.
याबाबत बापुराव दत्तात्रय पाटील (वय ३०), रा.कोरफळे ता. बार्शी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १७ एप्रिल २०२२ रोजी दुपारी मी व माझा भाऊ गणेश आम्हा दोघांना कल्याण शिवाजी पाटील याने घरी बोलावल्यामुळे आम्ही गेलो असता, त्याने सामाईकात असलेल्या शेतीच्या गटाची जमीन वाटणी करुन द्या असे सांगितले. तेव्हा हा गट आपल्या सगळ्यात सामाईक असून त्याची वाट कुठून जाणार ते मिटवा, असे आम्ही दोघे भाऊ म्हणालो.

त्यावरुन वाद होऊन त्याने व राजेंद्र शिवाजी पाटील, करण कल्याण पाटील, संभाजी कल्याण पाटील (सर्व रा.कोरफळे) यांनी शिवीगाळी करुन मारहाण केली. संभाजी कल्याण पाटील याने मला कु-हाडीच्या उलट्या बाजूने मारुन डोक्याचे पुढील बाजूला जखम केली. माझी आई काशिबाई व भाऊ गणेश यांनाही वरील सर्व लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
बापुराव पाटील यांच्या तक्रारीवरुन, बार्शी तालुका पोलीस ठाण्यात चौघाविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ३२३,३२४,३४,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.