दिनांक : १४ऑगस्ट; रविवार
श्रावणमास प्रवचनमाला
प्रवक्ते: गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले
विषय : संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान
श्रीभगवंत मंदिर, बार्शी.
श्रावणमास प्रवचनमाला:जीवनात अनुकूल व प्रतिकूल काळ येवो तुकाराम महाराजांची वृत्ती स्थिर होती-जयवंत बोधले महाराज
बार्शी: जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांच्या जीवनाला महत्वपूर्ण कलाटणी देणा-या काळाचे चिंतन करत असताना, प्रवचनमालेच्या १७ व्या दिवशी गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले सांगतात की, संत तुकाराम महाराजांच्या जीवनात कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल काळ येतो. तरीही, त्यांची वृत्ती दोलायमान न होता ती स्थिर आहे, हेच संत तुकाराम महाराजांच्या जीवनाचे वैशिष्ट्य आहे.

संत तुकाराम महाराजांना व्यवसायातून नफा मिळवता आला नाही. एका व्यक्तीने सोने म्हणून पितळ देऊन फसवणूक केली. यामुळे त्यांची पत्नी खोचक शब्दात एकवते , तुम्हाला संसार नीट करता येत नाही. तुमच्या प्रारब्धातच यश नाही. तेव्हा, मीच आता आपल्या संसाराचा गाडा चालवते. महाराज जिजाईंना होकार देतात.हे विशेषत्वाने पाहण्यासारखे आहे की, तो काळ अतिशय पुरुषप्रधान असतानाही संत तुकाराम महाराजांनी स्त्रीच्या मताचा पुरस्कार केलेला आहे. वेळप्रसंगी स्त्रीयांनी जबाबदारी स्विकारुन प्रपंचाच्या उभारीसाठी हात लावला पाहिजे.

संत तुकाराम महाराजांच्या पत्नी रुक्माई सरळमार्गी, मवाळ होत्या. जिजाई मात्र मोठ्या तापट, कडक शिस्तीच्या होत्या.याचा अर्थ असा मुळीच नव्हे की, जिजाईंच्या मनामध्ये तुकाराम महाराजांबद्दल प्रेम नव्हते. भावनाशुध्द अंत:करणाच्या असणाऱ्या जिजाईंशिवाय तुकाराम महाराजांचे चरित्र सांगताच येणार नाही. त्यांचा अधिकार फार मोठा आहे. भगवान परमात्म्याने जिजाईंचे पाय स्वत:च्या हातात घेऊन पायातला काटा काढावा ;जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पत्नी म्हणून भाग्य लाभलेल्या जिजाई आहेत. चंद्र, सूर्य असेपर्यंत ज्ञानोबा-तुकाराम हे शब्द राहतील असे नव्हे तर, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हे शब्द आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य असतील ,असे हे संतांचे अजरामर चरित्र आहेत. असे गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज स्पष्ट करतात.
जिजाई तुकाराम महाराजांना म्हणतात ,आपण आता नवीन व्यवसाय करु. भावाकडे जाऊन जिजाई त्यासाठी भांडवल म्हणून २००रुपये आणतात. गुळाचा व्यापार करण्याचे ठरविले. बाहेरगावी जाऊन गुळ विक्रीतून तुकाराम महाराजांना २५०रुपये मिळाले. ते घेऊन परतीच्या वाटेवर असताना महाराजांना साखळदंडानी बांधलेला एक व्यक्ती दिसला. ती व्यक्ती विलाप करत होती. सावकाराचे ३०० रुपये कर्ज त्याला द्यायचे होते. ५०रुपये त्याने अगोदरच दिले होते. २५०रुपये द्यायचे राहिले होते. तुकाराम महाराजांना त्याची दया येते. व त्याला २५०रुपये गुळ विक्रीतून मिळालेले ते पैसे देऊन टाकतात. महाराज जिजाईंना सर्व कहाणी कथन करतात. जिजाईंची महाराजांसमोर आदळा-आपट सुरु होते.
पुढे दुष्काळ पडल्याने २ वेळचे पुरेसे अन्न खायला मिळेना. रुक्माईला दम्याचा त्रास असल्याने त्यांचे निधन झाले. तुकाराम महाराज असह्य झाले. त्यांना संसारातून विरक्ती निर्माण होऊ लागली. संत तुकाराम महाराज म्हणतात, माया ही असार आहे. केवळ भगवंत हेच सार आहे. हे सर्व देवाने माझी परीक्षा घेण्यासाठीच केले असावे. अशी महाराजांची भावना तयार झाली. पुढील प्रवचनात संत तुकाराम डोंगरावर जाऊन भजन करतात. तिथे घडलेल्या भगवंताच्या लीला, प्रसंग याचे चिंतन होईल.