दिनांक : १७ऑगस्ट; बुधवार
श्रावणमास प्रवचनमाला
प्रवक्ते: गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले
विषय : संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान
श्रीभगवंत मंदिर, बार्शी.
विरक्ती अवस्था प्राप्त झाल्यामुळे तुकाराम महाराज पाप-पुण्याच्या पलीकडे गेले होते-जयवंत बोधले महाराज
बार्शी: श्रावणमास प्रवचनमालेतील २०व्या दिवशीची सेवा भगवंत चरणी समर्पित करत असताना गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले निरुपण करतात की, संत तुकाराम महाराजांना विरक्ती अवस्था प्राप्त झाल्यामुळे आता त्यांना पांडुरंगाच्या नामस्मरणाशिवाय कोणतीही गोष्ट नको होती. तिळमात्रही प्रपंचात रस वाटत नव्हता. अखंड ‘रामकृष्णहरि’ सुरु ठेवणे हेच त्यांच्या मनी रमले होते.

संत तुकाराम महाराज म्हणतात- वचन नाही मानियेले। समूळ प्रपंच विराळा। मूळासहित हा प्रपंच माझ्या मनातून निघून गेला आहे. प्रपंच्याविषयी वाटणा-या आसक्तीचा नाश झाला आहे. तेव्हा, नका मजपाशी, वदू प्रपंचाशी। आता माझ्याजवळ प्रपंचाच्या गोष्टी बोलू नकात. कारण मी जाणले आहे की, या प्रपंच्यात कितीही रस घेतला. तरी त्यातून काहीही निष्पण होत नाही. आता माझ्या वृत्तीचा तो विषय राहिला नाही. माझ्या कानाला भगवंताविषयी ऐकायची गोडी लागली आहे. त्यामुळे, पापा-पुण्याच्या गोष्टी करणे व्यर्थ आहे. म्हणून, तुकाराम महाराज सांगतात- तुका म्हणे आता। आम्ही झालो अग्निरुप।
पाप-पुण्याच्या पलीकडे आम्ही गेलो आहे.

गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज संत तुकाराम महाराजांचा दृष्टांत देऊन स्पष्ट करतात की, “सांडियेली पाने पुढे पिका अवलोकने।” उदा. आपण झाड लावले. ते मोठे होताना सुरुवातीला त्याची पाने पाहून कौतुक वाटते. परंतु, जसे झाड मोठे होईल व फळे लागले असता आपण त्या पानाकडे पाहत नाही त्या फळाकडे पाहतो. त्याप्रमाणे, तुकाराम महाराज म्हणतात, आता त्या पानाकडे (प्रपंचाकडे) न पाहता, फळाकडे (परमात्म्याकडे) चाललो आहे. आता मी त्या झाडाच्या पानाकडे (प्रपंचाकडे) कधीही पाहणार नाही. कारण, मला आता त्या झाडाची फळे दिसू लागली आहेत. मला आता परमात्मा दिसू लागला आहे.

पुढे, संत तुकाराम महाराज आपल्या गावातील लोकांना आवाहन करतात. आपले हे जुने मंदिर फार जीर्ण झाले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करावा लागणार आहे. हे मंदिर गेल्या ८ पिढ्यांपासून अस्तित्वात असल्याने , ते भंगले आहे. असे म्हणून महाराजांनी स्वतः पासून मंदिराच्या जिर्णोद्धाराची सुरुवात करावी. गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज श्यामची आई या ग्रंथातील अनमोल विचार नमूद करत सांगतात की, ज्याप्रमाणे पायाला घाण लागू नये म्हणून काळजी घेतोस, तसे मनालाही घाण न लागू देण्याची काळजी घे. मनाची शुध्दता, पावित्र्यता आत्यंतिक जरुरीची आहे. गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज स्पष्टपणे सांगतात की, कीर्तनामध्ये अभ्यास, सेवा आणि आचरण या गोष्टी अग्रभागी आहेत.
तुकाराम महाराज मंदिराचा जिर्णोद्धार करुन गावातील वारकरी एकत्रित करतात.सामूहिक भजन सुरु करतात. तुकाराम महाराजांना भजन उत्तम येऊ लागते. नंतर , त्यांना अशी कल्पना येते की, एकादशीला नामसंकीर्तन व्हावे म्हणून बाहेरगावी जाऊन स्वत: कीर्तनकाराला आमंत्रित करतात. ही हरिनामाची रोजनिशी तुकाराम महाराज कधीही चुकवत नव्हते. त्यानंतर, तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरी, भागवत, पुराण, शास्त्रांचा तसेच वेदांचा अभ्यास केला. स्वत :कीर्तन करण्यासाठी उभे राहू लागले.