बार्शी : शेतातील सामाईक विहीरीतील पाण्याच्या कारणांवरुन झालेल्या वादात मारहाण करुन दंडाचा चावा घेण्याची घटना बार्शी तालुक्यात घडली.
संतोष रंगनाथ कापसे (वय ३३) रा. जवळगांव नं. २, ता. बार्शी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २ मे रोजी माझे वडिल शेतात गेले होते, तेव्हा आमच्या शेताशेजारी शेती असलेले माझे चुलते अरुण निवृत्ती कापसे व त्यांचा मुलगा वैभव कापसे (दोघेही रा. जवळगांव नं. २, ता. बार्शी) यांनी सामाईक विहिरीतील पाण्याच्या कारणावरुन माझ्या वडिलांना शिवीगाळी केली होती.

सदर प्रकार वडिलांनी मी रात्री घरी आल्यानंतर मला सांगितला. म्हणून दि. ३ मे रोजी सकाळी दहाचे सुमारास मी चुलते व चुलत भाऊ यांना त्याबाबत विचारणा केली असता, तू आम्हाला का विचारतोस असे म्हणत मला शिवीगाळी, दमदाटी करुन काठीने डाव्या दंडावर मारुन जखमी केले, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच वैभव कापसे याने माझ्या उजव्या दंडावर चावा घेऊन जखमी केले. त्यावेळी मी मोठ्याने ओरडल्याने शेजाऱ्यांनी येऊन मला सोडविले.
संतोष कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.