बार्शी उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी 2 ते 3 महिन्यात निविदा प्रसिद्ध करा – देवेंद्र फडणवीस
बार्शी- तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी असलेली बार्शी उपसा सिंचन योजना ही मागील २८ वर्षांपासून रखडलेली आहे. ही योजना पूर्ण व्हावी व तालुक्यात हरित क्रांती घडावी यासाठी आ राजाभाऊ राऊत हे शासन दरबारी सतत प्रयत्नशील आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या दालनात या उपसा सिंचन योजना संदर्भात दिनांक २६ जुलै २०२२ रोजी जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव विलास राजपूत व आमदार राजेंद्र राऊत यांची बैठक झाली. या बैठकीत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संपूर्ण योजनेची माहिती घेऊन, रखडलेली योजना पूर्ण करण्यासाठी येत्या २ ते ३ महिन्यात निवीदा प्रसिद्ध करून, २ ते ३ वर्षांत योजना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबत झालेल्या या बैठकीतील आदेशाच्या अनुषंगाने तातडीने जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व संबंधित अधिकारी हे दिनांक २९ जुलै रोजी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे भेट देऊन कामाची पाहणी करणार असून, येथील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
त्याचबरोबर या योजनेत नव्याने आणखीन चार गावांचा समावेश झाल्यामुळे, ही योजना पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील जवळपास १२ हजार ५५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.