
शिवसैनिक नितीन नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी
शिवसैनिक नितीन नांदगावकर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. याबाबत नांदगावकर यांनी पोलिसात धाव घेतली आहे. सकाळी आकाराच्या सुमारास त्यांना फोनवरुन धमकी देण्यात आली आणि शिवीगाळ करण्यात आली असंही नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

नांदगावकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, “तीन दिवसांपूर्वी म्हणजेच 17 जुलै रोजी मी शिवसेनेच्या वतीने हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये जाऊन रिक्षा चालक कोरोना रुग्णाचे बिल कमी होणेबाबत आणि मृतदेह ताब्यात मिळण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यास गेलो होतो. त्यावेळी तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांशी माझा वाद झाला होता. सदर हिरानंदानी रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजित चटर्जी यांना जाब विचारला असता त्यांनी मला दम देत सांगितले की आठ लाख भरा व मृतदेह घेऊन जा.”
मी त्यांना एकही रुपया भरणार नाही आणि मृतदेह घेऊन जाणार नाही असे सांगून रिक्षा चालकाचा मृतदेह घेऊन आलो. त्यावेळी तिथल्या सुरक्षा रक्षकांनी मला धक्काबुक्की केली आणि माझ्या अंगावर धावून येण्याचाही प्रयत्न केला. यानंतर आज सकाळी ११.१७ च्या सुमारास माझ्या मोबाइलवर धमकीचा फोन आला आणि मला शिव्या देण्यात आल्या, असं नितीन नांदगावकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
