मराठा समाजासाठी आजचा हा काळा दिवस चंद्रकांत पाटलांची आघाडी सरकारवर टीका
ग्लोबल न्यूज : मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील महाविकास आघाडीचा महाभकास असा उल्लेख करत जोरदार हल्ला चढविला आहे. महाभकास आघाडीला कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आले नाही . आजचा दिवस हा मराठा समाजाच्या आयुष्यातील काळा दिवस आहे असे पाटील यांनी बोलून दाखविले.


पाटील बोलताना म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम आमच्या सरकारने केले. हे आरक्षण काही महिने टिकल्यानंतर त्याला स्थगिती मिळाली. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आमचे प्रयत्न राहिले. मात्र महाभकास आघाडीच्या सरकारला सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकवता आले नाही, अशा शब्दांत पाटील यांनी सरकारच्या ढिलाईवर बोट ठेवले.
मराठा आरक्षणासंबंधी न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही यावेळी पाटील यांनी लक्ष्य केले. हा विषय जरा गांभीर्याने घ्या, असे आम्ही वारंवार सरकारला सांगत होतो मात्र हवं तसं लक्ष दिलं गेलं नाही. अशोक चव्हाण यांना ते जमलं नाही, अशी टीका पाटील यांनी केली.