कोल्हापूर: सारथी संस्थे संदर्भात खा छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजातील इतर नेत्यांनी देखील सारथी संस्था टिकवण्यासाठी भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मराठा समाजातील प्रतिनिधी यांची बैठक झाली. यावेळी संभाजीराजे यांना तिसऱ्या रांगेत बसवल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शेवटी अजित पवार यांनी मध्यस्थी केल्यान वाद वाढला नाही.

दरम्यान, छत्रपती घराण्याचे संस्कारच आहे की आपण रयतेचे सेवक आहोत. स्वतः पेक्षा रयतेला महत्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे. छत्रपती घरण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिवभक्तांना मी सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे.

समाजाने जो सारथी चा लढा उभा केला होता, मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्याच्या पूर्णतेची सकारात्मक सुरुवात झाली हे जास्त महत्वाचे. आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, माझ्यावर प्रेम व्यक्त केलं ते पाहून मला समाधान वाटलं. तुम्हा सर्वांचं छत्रपती घरण्यावर असलेला हा विश्वास मी जपण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.
बैठकीनंतर अजित पवार यांनी तत्काळ ८ कोटी रुपये सारथी संस्थेला देणार असल्याचं जाहीर केल आहे. यावेळी सारथी संस्थेची स्वायत्तता कायम राहील आणि संस्थेला तातडीनं ८ कोटींचा निधी दिला जाईल, असं जाहीर केलं. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था कदापि बंद होणार नाही. समाजबांधवांच्या शाश्वत विकासासाठी ‘सारथी’कडून ‘व्हिजन २०२०-३०’ हा दहा वर्षांचा आराखडा तयार केला जाईल. ‘सारथी’वरचे हेत्वारोप टाळून बदनामी थांबवावी, असं आवाहन पवार यांनी यावेळी केले.