चारचाकी वाहनधारकांना चाकूचा धाक दाखवून लुटणारी टोळी गजाआड –
सोलापूर,दि.२९ : टेंभुर्णी आणि अकलूज रस्त्यावर गाडीला कट मारल्याचा बहाणा करून चारचाकी वाहनधारकांना थांबवून चालकाला शिवीगाळ, मारहाण करुन चाकूचा धाक दाखवून तसेच डोळ्यात चटणी टाकून ऐवज लुटणाऱ्या टोळीतील दोघा लुटारूंना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. (The two robbers have been arrested by the local crime branch police)

राजेंद्र हनुमंत शिंदे (वय २६, रा. मोडनिंब, ता. माढा), तेजस ऊर्फ टिल्ल्या सोमनाथ ऊर्फ अरुण जाधव (वय २०, रा. सवत गव्हाण, ता. माळशिरस) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. फिर्यादी जावेद खुतबुद्दीन नदाफ (रा. माळेवाडी, ता. माळशिरस) हे टेंभुर्णीहून अकलूजकडे मित्रासमवेत कारमधून जात असताना वाफेगाव फाट्याजवळ पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कट मारल्याचा जाब विचारत डोळ्यात चटणी टाकून सव्वालाखांची रोकड लुटली होती. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर अनंत वास्ते (रा. मोडनिंब, ता. माढा) यांनाही आरोपींनी वाहनाला कट मारल्याचा बहाणा करून शिवीगाळ करीत चाकूचा धाक दाखवून यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली होती.

याप्रकरणी टेंभुर्णी आणि अकलूज पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. वाहनधारकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमले होते.
जबरी चोरीतील आरोपींच्या मागावर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार काशीद, पोलीस कर्मचारी पारेकर, गायकवाड, बागवान, शिंदे, राठोड आदींनी केली.