राज्यात पुन्हा मॉन्सून सक्रीय होण्याची शक्यता
पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने मॉन्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. उद्यापासून राज्यात पाऊस सुरू होणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावासाची तर विदर्भ मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनची आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. तर पश्चिम किनारपट्टीला समातंर कमी दाबाचा पट्ट्याचा विस्तार कमी झाल्याने राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तर पाऊस सुरू असलेल्या भागातही जोर ओसरला आहे.

मात्र उद्यापासून मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे सकरण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण किनारपट्टीसह मध्य भारतात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यात विविध भागात सुरू असलेल्या पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तर कोकण, घाटमाथा, धरणांच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसाचा जोरही ओसरला आहे. शनिवारी (ता.११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी तर उर्वरीत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या.
दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने वाढीच्या अवस्थेत असलेल्या खरीप पिकातील मशागतींच्या कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी पावसाची दडी असल्याचे दिसून येत आहे.