मुलास रक्तदाबाचा त्रास असल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी दोन्ही किडनी खराब झाल्या असल्याचे सांगताच मेव्हणा व त्याचा मित्राने बनावट डॉक्टर बनून किडनी देतो, असे सांगून एक लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रदिप चतुर्भुज सुतार (रा. लक्ष्मीबाई हौसिंग सोसायटी, फुले प्लॉट, बार्शी), बिभिषण आजिनाथ सुतार (रा. प्रकाशनगर दुसरी गल्ली, साखर कारखान्याजवळ, ता. मिरज, जि. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. परमेश्वर संदिपान सुतार (रा. बावी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना 27 जानेवारी 2017 रोजी घडली. परमेश्वर सुतार यांचा मुलगा नितीन यास चक्कर येत असल्याने बार्शी येथील रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी रक्तदाब झाल्याचे सांगितले.

सुतार यांनी मुलगी पुणे येथे असते तेथे उपचार घेतो, असे सांगून पुण्यात उपचार केले. तेथे मुलाला पाहण्यासाठी राजेंद्र सुतार, बिभिषण सुतार, अरुण सुतार व त्यांचा मित्र प्रदिप सुतार रुग्णालयात आले. त्यांनी कागदपत्र पाहिली अन् प्रदिप सुतार डॉक्टर आहेत घाबरु नका, आपण ऑपरेशन करुन दुसरी किडनी बसवू शकतो, यासाठी 2 लाख 70 हजार रुपयांची तयारी करा, असे सांगितले.
बिभिषण सुतार यांचे सांगण्यावरुन 1 लाख 70 हजार रुपये दिले. पण नंतर प्रदिप सुतार याने किडनी देण्यास टाळाटाळ करताच त्यास पैसे परत मागितले. त्याने पाच हजार रुपये मित्राच्या खात्यावरुन पाठवले. उर्वरित पैशाची मागणी करण्यासाठी घरी गेलो असता सुतार याने मी डॉक्टर नाही, मी कोल्हापूर येथे पोलिस आहे, माझी बायको पोलिस आहे, मला तू पैसे दिले नाहीत, माझे कोणी काही वाकडे करु शकत नाही, मला जर पैसे परत मागितले तर हात-पाय तोडीन अशी धमकी दिली व हाकलून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस निरीक्षक रामदास शेळके करीत आहेत.