पाच साखर कारखाने चालविणारे अभिजित पाटील यांच्या घरासह सर्वच कारखान्यावर आयकर खात्याच्या धाडी
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांना धक्का देत पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (vitthal Sugar Factory) जिंकणारे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijit Patil) यांच्या कारखान्यावर, पंढरपूरमधील घरावर आणि पतसंस्थेच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने (इन्कम टॅक्स, Income tax) विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. आज पहाटे ही छापेमारी करण्यात आली असून अजूनही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. या छापेमारीमुळे पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Income tax raids on Abhijit Patil’s Sugar factory, house, office)

अभिजीत पाटील हे पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचे पंढरपूरमधील कार्यालय, घर आणि पतसंस्थेच्या कार्यालयात इन्कम टॅक्स विभागाची तपासणी सुरू आहे. इतर साखर कारखान्यांमध्ये ही तपासणी सुरू असल्याची माहिती आहे. आभिजित पाटील यांच्याकडे सध्या पाच साखर कारखाने आहेत.
धाराशिव साखर कारखान्यावरही छापा
उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर प्राप्तीकर विभागाचा छापा पडला आहे. आज पहाटेपासून प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरु केल्याची माहिती आहे. पंढरपूर येथील अभिजीत पाटील हे धाराशिव कारखान्याचे चेअरमन असून त्यांच्या इतर मालमत्तांवर धाडी पडल्याची प्राथमिक माहिती आहे.

अभिजित पाटील यांची ओळख साखर सम्राट निर्माण झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत २१ पैकी २० जागा जिंकल्याने पाटील प्रकाशझोतात आले होते. तसेच त्यांच्या ताब्यात एकूण पाच साखर कारखाने आहेत.
तीन साखर कारखान्यामध्ये, पंढरपूर मधील कार्यालयात व निवासस्थानी आयकर विभागाच्या पथकाने तपासणी सुरू केली आहे. कार्यालयाच्या बाहेर व निवासस्थानाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आता या धाड सत्रात आयकर विभागाला नेमके काय हाती लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
———— या ठिकाणी धाडी….
धाराशिव साखर कारखाना , चोराखडी , उस्मानाबाद धाराशिव साखर कारखाना , युनिट २ , लोहा नांदेड, वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी , चांदवड नाशिक या तीन खाजगी साखर कारखान्यावर व पंढरपुरातील डीव्हीपी समूहाचे कार्यालय, त्यांच्या निवासस्थानी धाडी सुरू आहेत.