बार्शीत पुरात वाहून गेलेल्या मयत चौधरींच्या कुटुंबाला शासनाने केली ४ लाखांची मदत
बार्शी प्रतिनिधी :
१४ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या अतिवृष्टी होवून बार्शी शहर व तालुक्यात नदी, नाले, ओढे यांना महापूर आला होता. बार्शी शहरातील सर्व नाले व पुलावरून पाणी वाहत होते. याचवेळी शहरातील राणा कॉलनी येथे वास्तव्यास असलेले अजय उर्फ दादा अर्जुन चौधरी हे पूल ओलांडून घराकडे जात असताना पुराच्या जोरदार प्रवाहामुळे पाण्यात वाहून गेले होते. त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते देण्यात आला.


यावेळी तहसीलदार प्रदीप शेलार, नगरसेवक रोहित लाकाळ, बाबासाहेब मांगडे, मदन देशमुख, काकासाहेब फपाळ, विशाल मांगडे, अजित मांगडे, रामभाऊ म्हस्के, विश्वास शेंडगे, पप्पू माने, संजय गव्हाणे, नारायण बनसोडे आदी उपस्थित होते.उपस्थीत होते.
चौधरी हे वाहून गेल्यानंतर प्रशासनामार्फत त्यांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्या काळात यश आले नाही.नातेवाईकांनी त्यांचा शोध घेवुनही ते सापडले नव्हते. याबाबत त्यांनी पोलिसात पती बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली होती.

दुर्दैवाने दि. २ फेब्रुवारी रोजी शहराजवळील एका शेतालगत ओढ्यात एका काटेरी बाभळीच्या झाडात मानवी सांगाडा आढळला. तो अजय उर्फ दादा अर्जुन चौधरी यांचाच असल्याची ओळख नातेवाईकांकडून पटली आहे.यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

या घटनेनंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबास धीर देण्याचा प्रयत्न केला होता. आमदार राजेंद्र राऊत यांनी वेळोवेळी मृत दादा चौधरी यांचा तपास करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. तसेच हा विषय त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतही उपस्थित केला होता. शुकवार दि. १२ फेबुवारी रोजी शासनाच्या वतीने स्व. अजय चौधरी यांच्या पत्नी श्रीमती स्वाती अजय चौधरी यांना ४ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश आमदार राजेंद्र राऊत व तहसीलदार प्रदीप शेलार साहेब यांच्या हस्ते देण्यात आला.
