बार्शी : सासरच्या लोकांनी वारंवार माहेरवरुन पैसे आणण्यासाठी त्रास देऊन छळ केला म्हणून, माझ्या मुलीने आत्महत्या केली. असा आरोप आत्महत्या केलेल्या विवाहित मुलीच्या वडिलांनी केला आहे.
जयराम कुंडलिक कात्रे (वय ४१), रा. म्हसोबाची वाडी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद यांनी पांगरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, माझी मुलगी राधा ऊर्फ अस्मिता पाडुरंग पवार (वय २२) रा. मळेगांव, ता. बार्शी हीस तिचा नवरा पाडुरंग नागनाथ पवार, सासू मंगल नागनाथ पवार, सासरे नागनाथ विठ्ठल पवार (सर्व रा. मळेगांव, ता. बार्शी) यांनी लग्न झाल्यापासून थोडे दिवस चांगले सांभाळले.
त्यानंतर दि. २९ सप्टेंबर २०१९ पासून मुलगी राधा हीस ट्रॅक्टर घेण्यासाठी ५ लाख रुपयांची वारंवार मागणी केल्यामुळे त्यांना पैसै देऊनही, तसेच द्राक्ष बागेसाठी १ लाख २० हजार रुपये दिले असतानाही, त्यांनी परत द्राक्ष बागेच्या कामासाठी ६० हजार रुपयांची वारंवार मागणी करुन मुलीस शिवीगाळ, मारहाण करुन, तिला जेवायला न देता उपाशीपोटी ठेवून, जाचहाट करुन तिला त्रास देत होते.

त्या त्रासाला कंटाळूनच माझी मुलगी राधा ऊर्फ अस्मिता पाडुरंग पवार हिने दि. १५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी तिचे राहते घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली आहे. तिला सासरच्या लोकांनी त्रास दिल्यामुळेच त्या त्रासाला कंटाळून तिला आत्महत्या करण्यास परावृत्त केले आहे.
जयराम कुंडलिक कात्रे यांच्या फिर्यादीवरुन, पांगरी पोलिस ठाण्यात पती, सासू , सासरे यांच्या विरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ३०६,३२३,३४,४९८,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.