दिनांक : २१ऑगस्ट; रविवार
श्रावणमास प्रवचनमाला
प्रवक्ते: गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले
विषय : संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान
श्रीभगवंत मंदिर, बार्शी.
व्यक्तीला ज्या दिवशी गुरुकृपा होईल, तो दिवस म्हणजे त्या व्यक्तीचा दूसरा जन्म होय-जयवंत बोधले महाराज
बार्शी: मनुष्य जीवनामध्ये गुरुकृपा फार महत्त्वाची आहे. एखाद्या व्यक्तीला ज्या दिवशी गुरुकृपा होईल, तो दिवस म्हणजे त्या व्यक्तीचा दूसरा जन्म होय. संत तुकाराम महाराजांना जेव्हा गुरु भेटले; त्यांना सद्गुरुंचे दर्शन झाले, तो दिवस महाराजांचा पुर्नजन्म होय. असे विवेचन गुरुवर्य डॉ जयवंत महाराज बोधले यांनी केले.

संत तुकाराम महाराजांना देवाची कृपा माझ्यावर कधी होईल त्यासाठी, मला सद्गुरुंची भेट अगोदर व्हावी लागेल. सद्गुरुंची भेट होण्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात- आत्मदर्शनाशिवाय समाधान मिळणार नाही. आत्मदर्शन होण्यासाठी आत्मज्ञान प्राप्त करुन घ्यावे लागेल. त्यासाठी सद्गुरुकृपा व्हावी लागेल. अंत:करणातील तीव्र जाणीवेतून सद्गुरुंची भेट होते.

संत तुकाराम महाराज म्हणतात – मला आता घरी घेऊन जावा. प्रत्यक्षात तुकाराम महाराज घरातच असतात. तरीही ते असे का म्हणतात? तुम्ही जे घर म्हणता ते घर मी मानत नाही. ज्या घरात कोणतीही आसक्ती नाही. अशा घरी मला घेऊन चला. असे तुकाराम महाराज म्हणतात.
सहज फिरता आलो।
हे संत तुकाराम महाराजांचे सहज फिरणे म्हणजे जन्म-मरणाच्या फे-यातून यातना भोगून दु:खातून मी सहज फिरतो आहे. मला कोणत्याही प्रकारची दु:खाची जाणीव होत नाही. यावेळी गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज म्हणतात, दु:खाला जो सहजपणे पाहतो तो महात्मा होय. मानवी जीवनाच्या कृतकल्याणासाठी लागणा-या सद्गुरुकृपेचे अनन्यसाधारण महत्त्व गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज सुसंगत अशा अनेक तात्विक भूमिकेतून स्पष्ट करतात.

संत तुकाराम महाराजांना लोक म्हणतात, सहज आलात… तर मग राहा ना! तेव्हा, तुकाराम महाराज म्हणतात, मला आकार असलेल्या घरी जायचे नाही. मला निराकरण असलेल्या घरी जायचे आहे. परमात्म्याकडे जायचे आहे. अद्वैत स्थिती असलेल्या निर्गुणाकडे जायचे आहे.
तुकाराम महाराज अचानक आनंदी होतात. माझ्या स्वप्नात मला सद्गुरुंची भेट झाली आहे. ते कृपाळू दयाळू आहेत. ब्रह्मस्थानी असलेले आहेत.
सद्गुरुराये कृपा मज केली।
गुरु ची व्याख्या गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज अतिशय सुलभ सांगतात-
गु म्हणजे अंध:कार आणि
रु म्हणजे प्रकाश.
तेव्हा, अंध: कार घालवून प्रकाश देणारा तो गुरु होय.
