मुलाच्या मित्रानेच मागितला 20 हजार हफ्ता, आरोपीवर खंडणीचा गुन्हा दाखल
बार्शी – शहरातील माजी नगरसेवक सोमनाथ रमाकांत पिसे यांना महिन्याला (20000) वीस हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष, म्हणजे सोमनाथ पिसे यांच्या मुलाच्या मित्रानेच ही खंडणी मागितल्याचं दिसून येते. कारण, फिर्यादी सोमनाथ पिसे यांचा मुलगा गणेश पिसेसह एका खुनाच्या गुन्ह्यातून जवळपास 7 वर्षानंतर निर्दोष सुटका झालेल्या आरोपी प्रवीण रिकीबेनेच ही खंडणी मागतिल्याचे उघड होत आहे.


सोमनाथ रमाकांत पिसे हे 11 मार्च रोजी सायंकाळी 6:30 च्या सुमारास, तेलगिरणी चौकातील सुभाष कवडे यांच्या चहाच्या टपरीवर उभा असताना, आरोपी प्रवीण नवनाथ रिकीबे उर्फ (बच्चन) व विकी डबडे या दोघांनी मिळून येऊन, ‘मी मानवी अधिकार याचा अध्यक्ष आहे’. तू बार्शीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मालमत्ता तयार केली आहे, असे म्हणत जबर मारहाण केली. पिसे यांना मारहाण करून, तुझा खोटा व्हिडीओ तयार करून, फेसबुकला टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. महिन्याला (20000) वीस हजार रुपये हप्ता म्हणून द्यायचे आणि नाही दिले तर तयार केलेला व्हिडिओ फेसबुकला टाकून, कुठेतरी नेऊन मारून टाकीन. याआधी एक खून पचवीला आहे असं म्हणत, (20000) वीस हजार रुपयांची खंडणीची मागणी करत, आरोपीने जीवे मागण्याची धमकी दिल्याची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, वरील आरोपींवर बार्शी पोस्टे गुरनं.154/2022 भादवी कलम 387, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे करत आहेत