बार्शी : लॉकडाउन कालावधीमध्ये सामान्य, गोरगरीब जनतेसाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेले स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहिती समजताच, पोलिसांनी वैराग व बार्शी बाजार समितीच्या काही दुकानात छापा टाकून लाखो रुपयांचा गहू, तांदूळ जप्त केली. या प्रकरणी दोन व्यापारी आणि एक दुकान चालक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश ए. बी. भस्मे यांनी शुक्रवारी फेटाळला. व्यापारी प्रशांत कथले, राकेश किलचे, स्वस्त धान्य दुकानदार संतोष गोडसे अशी जामीन फेटाळल्यांची नावे आहेत.

पनवेल येथे 33 लाख रुपये किमतीचा 110 टन तांदूळ काळ्या बाजारात सापडल्यानंतर या कारवाईला सुरवात झाली होती. पोलिसांनी वैराग येथे सतीष खेंदाड याच्या मार्केट यार्डातील दुकानात छापा टाकल्यानंतर तांदळाची 257 पोती (1 लाख 92 हजार 750 रुपये किंमत) तर गहू 94 पोती (70 हजार 500 रुपये किंमत) पोलिसांनी जप्त केली होती. बार्शीतील कथले याच्या दुकानावर छापा टाकला असता पोलिसांना बिल बुके सापडली होती. त्यामध्ये साळी खरेदी केल्याचे स्पष्ट झाले होते.

पनवेल येथे काळ्या बाजारात विक्री केलेल्या धान्याप्रकरणी भीमाशंकर खाडे (बार्शी), धनराज सुळे (वैराग), राकेश किलचे (बार्शी) ही नावे पुढे आली होती. प्रशांत कथले व राकेश किलचे हे दोघेजण व्यापारी स्वस्त धान्य दुकानदारांचे धान्य खरेदी करीत असल्याचे निष्पन्न झाले. सरकारी वकील ऍड. दिनेश देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तिघांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.