तब्बल 105 दिवसांनी ताडोबाची सफारी सुरु ; वाचा सविस्तर-

0
411

चंद्रपूर : जगभरातील पर्यटकांची व्याघ्र प्रेमींची पहिली पसंती असलेला चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत रुजू झाला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 105 दिवसांनी हे पर्यटन सुरू होत आहे. आत प्रवेश दिल्या जाणाऱ्या पर्यटकांना कोविड नियमांचे पालन मात्र बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्यात पर्यटकांसाठी ताडोबा सफारी बंद केली होती.

चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे व्याघ्र प्रेमींची पर्यटनासाठीची पहिली पसंती. ताडोबाच्या कोअर भागात सुमारे 100 तर बाह्य भागातही तेवढ्यात संख्येत वाघांचा अधिवास आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या मध्यात पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती. यासंदर्भात राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या सूचनेनुसार विविध पर्याय तपासून पाहण्यात आले. मात्र अखेर वन्यजीवांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतरच्या काळात कोरोनाने जगभरात थैमान घातला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आता जुलैच्या पहिल्या टप्प्यात अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया राबविली आहे. त्यानुसार पावसाळ्यात ताडोबाचे गाभा क्षेत्र पर्यटनासाठी बंद असले तरी बाह्य अर्थात बफर क्षेत्रात मात्र पर्यटन सुरू करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला. त्यानुसार 1 जुलैपासून ताडोबा बफरच्या पर्यटनाला सुरुवात करण्यात आली आहे. ताडोबा बफर भागातील 13 विविध प्रवेशद्वारामधून पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. यासाठी स्पॉट बुकिंग करताना शुल्कात सवलत देखील दिली गेली आहे.

पहिल्याच दिवशी पर्यटकांनी हिरव्याकंच वनराईतील पिवळ्याधम्म वाघोबाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र अर्थचक्र सुरळीत करण्याच्या प्रयत्नात संसर्ग वाढू नये याची जबाबदारी वनविभाग आणि पर्यटक दोघांनीही घेतल्याचे दिसले. वनविभागाने आत जाणारी वाहने आणि पर्यटक हे दोन्ही निर्जंतुक होऊन जातील याकडे लक्ष ठेवले आहे. वाहनांना निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली तर आत जाणाऱ्या पर्यटकांना मास्क आणि अन्य खबरदारी घेण्याची सक्त सूचना दिलेली आहे. अनेक दिवसानंतर ताडोबाचे पर्यटन सुरु झाल्यानंतर पर्यटकांनी मात्र आनंद व्यक्त केला.एकीकडे ताडोबातील वन्यजीव श्रीमंतीची सुरक्षा आणि दुसरीकडे पर्यटकांचा आनंद यादरम्यान वनविभागाने खबरदारीचे संतुलन राखत ताडोबातील सफारी सुरू केली आहे. मात्र आगामी काळात देश-विदेशातून येणार्‍या पर्यटकांसंदर्भात खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. वनविभाग त्यादृष्टीनेही सज्ज झाला आहे

ताडोबाचे स्वतःचे एक अर्थकारण आहे. देशविदेशातून येणारे पर्यटक त्यांच्यासाठी लागणाऱ्या सुविधा आणि सोबतच गावातील नागरिकांना रोजगार असे हे अर्थचक्र सुरळीतपणे सुरू होण्यासाठी ताडोबातील सफारी प्रारंभ होणे गरजेचे होते. अल्प प्रमाणात का होईना बफर क्षेत्रातील पर्यटन सुरू झाल्यानंतर या प्रयत्नांना निश्चित गती मिळणार आहे. मात्र त्यातही खबरदारी मात्र आवश्यक आहे.

साभार झूम ऑन न्यूज

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here