‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ ; वाचा आई विषयी एका मुलाच्या भावना

0
395

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ ; वाचा आईविषयी एका मुलाच्या भावना


बार्शी : आज माझ्या आईला जाऊन तीन दिवस झाले. माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी वडील गेले. घरची गरीबी होती. आई आणि वडिलांनी त्यांच्याजवळ जे काही होत ते सगळं भरभरून दिल. मी शाळेत जायचो तेव्हा चप्पल नसायची. उन्हात पाय पोळायचे. माझे वडील झोपडी वजा घराच्या दाराशी उभ राहून मी शाळेतून येतांना दिसलो की, तांब्यात पाणी घेऊन आधी माझ्या पायावर थंड पाणी टाकायचे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

खांद्यावरच्या उपरण्याने माझे पाय पुसून द्यायचे. आई चुलीवर कण्या खाऊ घालायची. आई-अण्णा दोघांनी त्यावेळी जे काम मिळेल ते सगळं काम करून मला मोठ केल. कधी कोणाची गुर राखायची, कधी कोणाचं पाणी भरून द्यायचं, धुणीभांडी करायची, लग्नाकार्यात पोळ्या लाटायला जायचं. कोणत काम केल नाही अस नाही. याकामाच्या बदल्यात त्याकाळी कधी दोन भाकरी, कधी दहा पैसे, तर कधी पायली भर धान्य मिळायच.

‘अण्णा’ गेल्यावर आईवर एकटीवर जबाबदारी पडली. वेळप्रसंगी जोगवा मागून खाऊ घातल. मी दहावी पास झालो तेव्हा ममदापूरमधून दहावी पास होणारा मी मुलगा होतो. मी पास झाल्याचा प्रचंड आनंद मला झाला होता. त्यादिवशी गावात येता-जातांना जो कोणी व्यक्ती दिसेल त्यांना सगळ्यांना ‘मी मॅट्रिक पास झालो’ हे सांगत होतो. तेव्हा आईने मला ‘दहा पैसे’ दिले होते. त्या दहा पैशाची छटाक (५० ग्रॅम) साखर आणून शेजार्‍यांना वाटली होती.

दहावीनंतर काम करून कॉलेज करत शिक्षण पूर्ण केले. मी जे काही कमावत होतो त्यातून माझा आणि आईचा खाण्यापिण्याचा खर्च भागत होता. मी जे करायचो त्याला आईचा मुक पाठिंबा आणि अंतकरणातून आशीर्वाद असायचा.

बी.कॉम झाल्यावर मी मुंबईत कामासाठी गेलो तेव्हाही आई काही न बोलता माझ्यासोबत होती. पंधरादिवसातून एकदा घरी आलो की, आईला खर्चाला पैसे द्यायचे. माझ लग्न झाल्यानंतर ममदापूरवरून बार्शीत शिफ्ट झालो तेव्हा आईला पैशाची ओळख झाली. तोपर्यंत तिने कधीही पन्नास शंभर रुपयाची नोट पाहिली नव्हती. मी दिलेले पैसे आई त्याची घडीकरून तिच्या पिशवीत ठेवायची. माझ्या घरी कामाला येणार्‍या लोकांशी बोलायची आणि तिला वाटलं की त्यांना तिच्या पिशवीतील पैसे काढून द्यायची. पुढे कामाचा व्याप वाढत गेला.

आई वयोमानामुळे थकली तरी मेमरी शार्प होती. माझ्या बोर्डिंगमधल्या शाळेच्या शिक्षकांचे नाव तिला अजूनही आठवत होत. या तीस वर्षात मी जेव्हा कधीही मुंबईतून बार्शीत गेलो, कोणत्याही वेळी गेलो दिवस असो रात्र असो की मध्यरात्र असो दार उघडून आई पलंगावर उठून बसायची. मी घरात आलो की, पहिला शब्द ‘सुरेश’ दूसरा ‘सुरेश तू आला, जेवला का’? मी हो म्हणालो की, परत जाऊन झोपायची.

संकेत लहान असतांना खूप आजारी पडला तेव्हा तिला जे समजलं त्या देवाला जायची तिथला अंगारा आणून त्याला लावायची. संकेतला बर वाटावं तो लवकर बरा व्हावा म्हणून जे सुचलं ते सगळं पायी चालत जाऊन केल. गेल्या तीस वर्षात मी जेव्हा जेव्हा घरी गेल्यावर परत मुंबईला निघायचो तेव्हा तेव्हा मी निघायच्या आधी किंवा उद्या निघणार आहे म्हणालो की, आधीच माझे कपडे लपून ठेवायची. माझे बूट लपून ठेवायची. मी निघताना बूट शोधायचो तेव्हा जरा मोठयाने बोललो की, मग बूट द्यायची आणि बूट देतांना परत ‘कवा’ (कधी) येशील हा तिचा प्रश्न.

या तीस वर्षात तिच्या माझ्यातील भावनिक संवाद. मी निघायच्या वेळी तिला पैसे द्यायचो. यातील एक पैसाही तिने कधी स्वत:साठी खर्च केला नाही. शेवटच्या वेळी तिच्या पिशवीत तीनशे रुपये घडी करून ठेवलेले मिळाले. मी येण्याआधी घरात चर्चा व्हायची.

माझा ड्रायवर घरी आला की, त्याला आवाज देऊन हे दहा रुपये तुला ठेव, सुरेश कधी येणार आहे. तू चालला का त्याला आणायला. याची चौकशी करायची. आमची शुगर टेस्ट करायला घरी माणूस येऊन गेला. त्याने रिपोर्ट दिला की, माझी साखर बरी आहे तुझीच जास्त असण. काळजी घेत जा म्हणून परत सुरेश, जेवला का? हे तिच कायमचं वाक्य.

वडील गेल्यानंतर मला जीवापाड जपणारी प्रेम करणारी एकमेव व्यक्ति म्हणजे माझी आई होती. आज आई नाही हे मन स्वीकारायला तयार नाही. माझ पुस्तकं प्रकाशित झाल्यानंतर तिच्या सोबत काढलेला फोटो, तिने पुस्तकं हातात घेतलं अक्षर ओळख नसली तरी हे माझ पुस्तकं आहे हे तिला सांगितल्यावर तिने माझ्याकडे रोखलेली नजर. काही बोलता येत आल नाही तरी तिच्या डोळ्यात त्यावेळी आलेली चमक कधी विसरू शकतं नाही.

हे सगळे क्षण, आठवणी मागे ठेऊन शेवटच्या क्षणी माझ्या खांद्यावर डोक ठेऊन, अनंतात विलीन झाली…. माझी आई… संत रामदास सांगून गेले तशी माझी अवस्था आहे .. ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’

सुरेश शेळके बार्शी

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here