सुशांतसिह राजपूत प्रकरणी सामनातून संजय राऊतांची रोखठोक भूमिका-वाचा सविस्तर-

0
357

सुशांतसिह राजपूत प्रकरणी सामनातून संजय राऊतांची रोखठोक भूमिका-वाचा सविस्तर-

ग्लोबल न्यूज: काही दिवसापूर्वी सिनेअभिनेता सुशांतसिह राजपूत याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत दोन गट पाहावयास मिळाले होते. तसेच चित्रपट सृष्टीत चालू असलेली घराणेशाहीवर काही कलाकार आता खुलेआम बोलू लागले होते. यावर आता शिवसेनेच्या सामना या अग्रलेखातून सुशांतच्या मृत्यूबद्दल रोखठोक भूमिका संजय राऊत यांनी मांडलेली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या अग्रलेखात त्यांनी यात त्यांनी आगामी काळात जॉर्ज फर्नाडिस यांच्या बायोपिकमध्ये सुशांतसिंह राजपूत हा संभाव्य ‘जॉर्ज’ म्हणून डोक्यात असल्याचाही मोठा खुलासा तिन्ही केला आहे.

संजय राऊत म्हणाले, “‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती संपल्यावर जॉर्ज फर्नांडीस यांच्यावर ‘बायोपिक’ करण्याचे ठरले. जॉर्ज यांची भूमिका करण्यासाठी २-३ अभिनेत्यांसोबत सुशांतच्या नावाचाच विचार मी करत होतो. धोनीच्या जीवनपटामुळे तो माझ्या नजरेत होता. पण २ दिवसांनी मला सांगण्यात आले, सुशांत उत्तम अभिनेता आहे. तो ही भूमिका लीलया पेलेल. पण सध्या त्याची मानसिक अवस्था चांगली नाही.

तो डिप्रेशनमध्ये आहे. चित्रपटांच्या सेटवर त्याचे वर्तन तऱ्हेवाईक असते. याचा सगळ्यांना त्रास होतोय. अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने याच कारणांमुळे त्याच्याशी करार मोडले. सुशांतने स्वतःच स्वतःच्या करिअरची वाट लावली, असे या जाणकाराचे सांगणे होते. त्यानंतर दोन महिन्यांत सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली. त्यामुळे संभाव्य ‘जॉर्ज’ पडद्याआड गेला.”

संजय राऊत यांनी आपल्या लेखात सुशांत सिंहची आत्महत्या हा खून असल्याच्या चर्चेवरही भाष्य केलं. तसेच हा खून नसून केवळ आत्महत्या असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे हा खून नाही. त्याने सरळ स्वतःच्या घरात आत्महत्या केली. आता काही उपप्रश्न येतात. सुशांत हा गेले काही दिवस मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत होता. या काळात त्याने मानसोपचार तज्ज्ञ बदलले पण उपयोग झाला नाही. सुशांतने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी वगैरे लिहून ठेवली नव्हती. तरीही सुशांतशी संबंधित अनेक महिला व उद्योगातील लोकांची रोज 11-11 तास चौकशी सुरुच आहे. ती कशासाठी?”

“सुशांतकडे काम नव्हते हे खोटे ठरत आहे. त्याची आर्थिक स्थितीही उत्तम होती. तो राहात असलेल्या घराचे भाडे 5 लाखांच्या आसपास होते. त्याच्याकडे महागड्या गाड्या होत्या. तो महिन्याला 10 लाख रुपये खर्च करत होता असे प्रसिद्ध झाले आहे. म्हणजे तो त्याचा आनंद घेत होता. माझ्या वाचनात आले की, प्रत्यक्षात यश राज प्रोडक्शनने सुशांतशी केलेल्या कराराचा पोलीस तपास करत आहेत. या कराराच्या प्रती पोलिसांनी मागवल्या आहेत. या करारांतून कोणते धागेदोरे मिळणार आहेत?” असाही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

रोखठोक जसेच्या तसे

सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केली. त्यास महिना होत आला. इतक्या दिवसांनंतरही प्रसिद्धी माध्यमे या आत्महत्येवर रकाने भरत आहेत. ‘लॉक डाऊन’ने चूल कायमची विझली म्हणून पुण्यात पत्नी आणि दोन लहान मुलांसह अतुल शिंदे या तरुणाने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची फाइल बंद झाली. सुशांतच्या आत्महत्येचा उत्सव होतो, पण त्यात शिंद्यांना स्थान नाही.

सुशांतसिंह राजपूतचे जाणे सगळय़ांनाच चटका लावून गेले. सुशांत अनंतात विलीन झाला, पण त्याच्या मृत्यूनंतर अनेक थंड पडलेले आत्मे जागे झाले आहेत.

सुशांत राजपूतने आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून खून आहे. त्याच्या मृत्यूची ‘सीबीआय’ चौकशी करा, अशी नवी मागणी भाजपच्या एक खासदार रूपा गांगुली यांनी केली. सुशांतच्या आत्महत्येवरून अशा मागण्या रोजच समोर येत आहेत. सुशांतने निराशेच्या झटक्यात आत्महत्या केली. त्याच्या नैराश्येचे कारण खरंच व्यावसायिक होते काय? हे शंभर टक्के सत्य नाही.

सुशांतची आत्महत्या दुःखद आहे, पण प्रत्येक आत्महत्या ही तितकीच दुःखद असते. मात्र त्या आत्महत्यांची इतकी फिकीर आपला समाज करीत नाही. हा मजकूर लिहीत असताना कोपरखैरणे परिसरात अमर पवार (40) याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले. लॉक डाऊनमुळे त्याची नोकरी गेली. आर्थिक चणचण वाढली. पत्नी व दोन मुलांसह तो राहत होता. त्याची लहान मुलगी विकलांग आहे. त्याच चिंतेचे ओझे वाटले व अमर पवारने आत्महत्या केली. अमर पवारच्या मृत्यूने मी जास्त चिंतेत आहे; कारण भविष्यात असे अनेक अमर पवार आत्महत्या करतील असे वातावरण आज दिसत आहे. ते गंभीर आहे.

कसले ते रहस्य?

सुशांतच्या आत्महत्येस अचानक ‘उत्सवी’ स्वरूप प्राप्त झाले. ही एक प्रकारची विकृती आहे. या आत्महत्येमागे रहस्य आहे असे काही लोकांना वाटते. सुशांत असे पाऊल उचलेल अशी आपल्याला शंका होती, असे एका चित्रपट निर्मात्याने जाहीर केले; पण सुशांतला वाचविण्यासाठी त्याने काय केले? देशात कोरोनाचा कहर, रोज शे-पाचशे लोक कोरोनाने मरत आहेत. त्यात चिनी आक्रमणाने 20 जवानांचे बलिदान झाले. तरीही सुशांतच्या आत्महत्येची बातमी महिनाभर जागा व्यापत आहे.

हिंदी सिने कलाकार व सिनेसृष्टीने माध्यमांचे व समाजाचे जीवन किती व्यापले ते सुशांत आत्महत्या प्रकरणात दिसले. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास कधी संपेल ते सांगता येत नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर या क्षेत्रातील अनेकांनी मौन सोडले; परंतु त्यामुळे या प्रकरणातील सत्य प्रकट झाले असे नव्हे. सुशांत प्रकरणात आता शोध घ्यावा असे काय उरले आहे व पोलीस नेमका कोणाचा तपास करीत आहेत? गेल्या काही काळापासून हा अभिनेता अज्ञातवासात होता. त्याची मानसिक स्थिती बरी नव्हती.त्याच वैफल्यग्रस्त अवस्थेत त्याने वांद्रय़ाच्या राहत्या घरी गळफास लावून मरण पत्करले. पण या निमित्ताने बॉलीवूडमधील, संगीत क्षेत्रातील माफिया पद्धतीचे टोळीयुद्ध, घराणेशाही याचा फुगा फुटला आहे.

जॉर्ज फर्नांडिस पडद्याआड

सुशांत राजपूत हा गुणी अभिनेता होता. राजपूतसारखे अनेक अभिनेते संघर्ष करून या क्षेत्रात उभे राहिले. ते खंबीरपणे काम करीत आहेत. त्यामुळे हिंदी सिनेसृष्टीवर दोन-पाच लोकांचा ताबा आहे व त्यांनी कोंडी केल्यामुळे सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली हे बोलणे योग्य नाही. हे खरे मानले तर रोज दोन अभिनेते आत्महत्या करतील. सुशांत राजपूत याने ‘धोनी’ चित्रपटात महेंद्रसिंग धोनीची भूमिका केली. हा चित्रपट गाजला. राजपूत याने इतर चित्रपटांत भूमिका केल्या. त्याने आत्महत्या केली तेव्हा त्याचे सहा चित्रपट निर्मात्यांशी करार झाले होते. मी स्वतः या क्षेत्राशी काही प्रमाणात संबंधित आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती संपल्यावर जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर ‘बायोपिक’ करण्याचे ठरले. जॉर्ज यांची भूमिका करणारे चेहरे म्हणून ज्या दोन-तीन अभिनेत्यांची नावे समोर आली त्यात सुशांतचे नाव होते. धोनीमुळे तो माझ्या नजरेत होता. पण दोन दिवसांनी मला सांगण्यात आले, सुशांत उत्तम अभिनेता आहे. तो ही भूमिका लीलया पेलेल, पण सध्या त्याची मानसिक अवस्था चांगली नाही. तो डिप्रेशनमध्ये आहे. चित्रपटांच्या सेटवर त्याचे वर्तन तऱहेवाईक आहे. याचा त्रास सगळय़ांना होतोय. अनेक मोठय़ा प्रॉडक्शन हाऊसनी याच कारणांमुळे त्याच्याशी करार मोडले आहेत. सुशांतने स्वतःच स्वतःच्या करीअरची वाट लावली असे या जाणकाराचे सांगणे होते व त्यानंतर दोन महिन्यांत सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली. त्यामुळे पडद्यावरचा संभाव्य ‘जॉर्ज’ पडद्याआड गेला.

शिंदे कुटुंब का मेले?

महाराष्ट्रात व देशात गरीब आणि मध्यमवर्गीय, श्रमिक, शेतकरी रोजच कुठे ना कुठे आत्महत्या करीत असतो. कर्जबाजारीपणातून लाखो शेतकऱयांनी गेल्या 10 वर्षांत आत्महत्या केल्या. ‘नोटाबंदी’ने अनेकांच्या नोकऱया व रोजगार गेले. त्या धक्क्याने शेकडो लोकांनी आत्महत्या केल्या. आता ‘लॉक डाऊन’ काळात अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडत आहेत व त्यातून नोकऱया, रोजगारावर मोठे संकट उभे राहिले. ते चित्र भयावह आहे. पुण्यात अतुल शिंदे यांनी त्याची पत्नी, दोन लहान मुलांसह आत्महत्या केली. शाळांची डिजिटल ओळखपत्रे तयार करण्याचा त्यांचा छोटा व्यवसाय होता. ‘लॉक डाऊन’ने शाळा बंद, शैक्षणिक संस्था बंद, त्यामुळे शाळांवर अवलंबून असलेला व्यवसाय बंद. त्या चिंतेतून अतुल शिंदेने त्याच्या कुटुंबासह जीवन संपवले. अशा अनेक आत्महत्यांना आपल्याला यापुढे सामोरे जावे लागेल. अतुल शिंदे व त्याच्या कुटुंबाची आत्महत्या ही सुरुवात आहे. पण अतुल शिंदेची फाइल आत्महत्या म्हणून पोलिसांनी बंद केली. शिंदे गरीब होता. त्याच्या मरणाने मेला, पण सुशांत राजपूतच्या आत्महत्येला प्रसिद्धीचे व उत्सवाचे वलय लाभले. त्यामुळे पोलीस त्याच्या आत्महत्येच्या मुळाशी व तळाशी जात आहेत.

हा खून नाही!

सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे, हा खून नाही. त्याने सरळ स्वतःच्याच घरात आत्महत्या केली. आता काही उपप्रश्न असे –

1) सुशांत हा गेले काही दिवस अनेक मानसोपचार तज्ञांकडून उपचार घेत होता. या काळात त्याने मानसोपचार तज्ञ बदलले, पण उपयोग झाला नाही.

2) सुशांतने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी वगैरे लिहून ठेवली नव्हती. (Suside note) तरीही सुशांतशी संबंधित अनेक महिला व उद्योगातील लोकांची रोज 11-11 तास चौकशी सुरूच आहे. ती कशासाठी?

3) सुशांतकडे काम नव्हते हे खोटे ठरत आहे व त्याची आर्थिक स्थितीही उत्तम होती. तो राहत असलेल्या घराचे भाडे पाच लाखांच्या आसपास होते. त्याच्याकडे महागडय़ा गाडय़ा होत्या. तो महिन्याला 10 लाख रुपये खर्च करीत होता असे प्रसिद्ध झाले आहे. म्हणजे तो त्याचा आनंद घेत होता.

4) माझ्या वाचनात आले की, प्रत्यक्षात यश राज प्रॉडक्शनने सुशांतशी केलेल्या कराराचा पोलीस तपास करीत आहेत. या कराराच्या प्रती पोलिसांनी मागवल्या आहेत. या करारांतून कोणते धागेदोरे मिळणार आहेत?

5) सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचे कोणत्या अभिनेत्रीशी कसे संबंध होते ते प्रसिद्ध झाले. किमान दहा अभिनेत्रींचे हे संबंध उघड झाले व त्यातील काही अभिनेत्रींना पोलिसांनी सतत चौकशीसाठी बोलावले. याची गरज नव्हती. 34 वर्षांचा एक अभिनेता वेगवेगळय़ा अभिनेत्रींबरोबर संबंध ठेवतो. त्यातील अनेक मुलांशी त्याचे ब्रेकअप झाले होते व पुढे हा सुशांत वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करतो. त्याच्याकडे वैभव होते, कीर्ती होती. जगण्याचे साधन होते, पण त्याच्या गाडीला ब्रेक नव्हता. सुशांत हा अभिनेता होता व निराशेच्या गर्तेत इतरजण मरण पत्करतात तसे मरण पत्करले. त्याचे काही निर्मात्यांशी व बडय़ा कलावंतांशी संबंध बिघडलेले असतील, पण आज त्याच क्षेत्रात आयुष्मान खुरानापासून नवाजुद्दिन सिद्दिकीपर्यंत असंख्य कलाकार पाय रोवून उभे आहेत. आपले बाप बडे कलाकार आहेत म्हणून अनेक स्टारपुत्र पडद्यावर चालले नाहीत. शाहरुख खान, सलमान खानचे सिनेमेही कोसळत आहेत व नव्या कलाकारांचे सिनेमे चालत आहेत. त्यात सुशांत राजपूतही होताच.

उत्सवी आत्महत्या

कंगना राणावत या आघाडीच्या अभिनेत्रीने ‘बॉलीवूड’मधील काही टोळक्यांचा पर्दाफाश केला. या क्षेत्रात कंपूशाही आणि काही टोळक्यांची दहशत आहे असे कंगना म्हणते, पण तरीही कंगना तिच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहोचलीच आहे. सोनू निगमने संगीत उद्योगातील माफियागिरीवर हल्ला केला. त्यात अबू सालेमचे नाव आले. ही कंपूशाही क्रिकेट, राजकारण, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत आहे. तरीही नवे लोक येतात व नाव कमावतात. घराणी व कंपूशाहीपेक्षा चांगलं काम जास्त बोलतं. जे पाय रोवून उभे राहतात तेच संघर्षातून पुढे जातात. आज सुशांत राजपूतबाबत सगळय़ात जास्त चर्चा त्याच्या ‘अफेअर्स’ची म्हणजे भानगडींचीच होत आहे. त्याच्या ब्रेकअप झालेल्या मैत्रिणी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत व मीडिया त्या पोरींचा पाठलाग करीत आहे. यापैकी एकाही मुलीचे नाव सुशांतने त्याच्या चिठ्ठी-चपाटीत लिहिल्याचे दिसत नाही.

सुशांतची आत्महत्या हे उत्सवाचे एक निमित्त आहे. त्याच्या बायकांशी असलेल्या अनेक भानगडी (ब्रेकअप) हाच उत्सवी गुऱहाळाचा बिंदू आहे.

सुशांतवर उपचार करण्यासाठी मानसोपचार डॉक्टरांची फौज होती. जो मनानेच हरला आहे, त्याच्यावर मानसोपचारवाले काय करणार? हे सर्व मानसोपचार प्रयोग रामदेव बाबांनी कोरोनावर औषध आणल्याची बोंब ठोकल्यासारखे आहे. इंदूरचे आध्यात्मिक गुरू भय्युजी महाराज यांनी आत्महत्या केली. त्यांना काय कमी होते? राजकारणी, उद्योगपती, नोकरशहांत त्यांचे वजन होते. अनेक बडय़ा लोकांचे ते गुरू महाराज होतेच, पण वैयक्तिक आयुष्यातला ताण ते सहन करू शकले नाहीत व जगातला कोणताही मानसोपचार तज्ञ अशा वैयक्तिक तणावापासून मुक्ती देऊ शकत नाही.

भय्युजी भय्युजी महाराजही मानसोपचार तज्ञांचे सल्ले घेतच होते व एक दिवस त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यामुळे अशा प्रकरणात मानसोपचार वगैरे फेल आहेत. जगण्याचा संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. कोपरखैरणेच्या अमर पवारला नोकरीची, तर पुण्याच्या अतुल शिंदेला चूल पेटण्याची चिंता होती. ती चूल कायमची विझेल या भयात त्याने आत्महत्या केली. शिंदे-पवारांची फाइल 24 तासांत बंद झाली. सुशांतची फाइल हलते आहे, चालते आहे. त्याची आत्महत्या जरा वेगळी आहे.

आत्महत्येचे मार्केटिंग!

एखाद्याच्या मृत्यूचा किंवा आत्महत्येचा ‘उत्सव’ कसा साजरा होतो, एखाद्या आत्महत्येचेही ‘मार्केटिंग’ कसे केले जाते त्याचे उदाहरण म्हणून सुशांतसिंह प्रकरणाकडे पाहता येईल. जो उठतोय तो या प्रकरणात हात धुऊन घेतोय. त्याची दोन उदाहरणे देतो व हा विषय आवरतो.

1) सुशांतसिंह राजपूतच्या जाण्याने त्याचा लाडका कुत्रा ‘फज’ याला प्रचंड धक्का बसलाय. सुशांतच्या प्रिय फजने मालक गेल्याच्या दुःखाने खाणे-पिणेच सोडले व त्यानेही दुःखाने मृत्यूस कवटाळले ही बातमी प्रसिद्धी माध्यमे व सोशल माध्यमांत पसरली. नंतर ‘फज’ जिवंत असून असे काहीही घडले नसल्याचा खुलासा झाला.

2) सुशांतच्या आत्महत्येनंतर पाचव्या-सहाव्या दिवशी राखी सावंत या अभिनेत्रीने आणखी एक विनोद केला. तिने स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करून सांगितले, काल रात्री सुशांत तिच्या स्वप्नात आला. सुशांतने तिला झोपेतून जागे केले व सांगितले, ‘बाई, तू लग्न कर. मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे!’

सुशांत आत्महत्येचे हे साइड इफेक्टस् आहेत. सिनेमाच्या पडद्यावर पूर्वी ‘स्पेशल इफेक्ट’ नावाच प्रकार होता. आता ‘सुशांत इफेक्टस्’ आहेत. एखाद्याला मृत्यूनंतरही सुखाने जगू देत नाहीत. सुशांतच्या छळलेल्या आत्म्यालाही ‘डिप्रेशन’ यावे असे हे प्रकार आहेत. ते आता तरी थांबावेत!

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here