
सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळा,अन्यथा पुन्हा लॉकडाऊन – जयंत पाटील
सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत ६४१ कोरोना बाधीत झाले असून ही स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत. मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा. अनावश्यक गर्दी टाळावी. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, अशी स्पष्टता पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोविडच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यात आजतागायत ६४१ कोरोना बाधीत झाले असून यापैकी उपचाराखाली सद्यस्थितीत ३०४ रूग्ण आहेत तर ११ रूग्णांची स्थिती चिंताजनक आहे.

तर आत्तापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. आजतागायत आढळून आलेल्या ६४१ रूग्णांपैकी ग्रामीण भागातील ४७४, शहरी भागातील ६७ तर महानगरपालिका क्षेत्रातील १०० रूग्ण आहेत. रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून ही स्थिती गंभीर आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी तालुकानिहाय कोरोना बाधीत रूग्णांचा सविस्तर आढावा घेतला.
