दक्षिण काशी जेऊरच्या स्वयंभू शिवलिंगात अवतरली गंगा!
यंदा शनिवारीच काशी येथून प्रकटले जल
सोलापूर : दक्षिण काशी समजल्या जाणार्या श्रीक्षेत्र जेऊर (ता.अक्कलकोट) येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिरात शिवलिंगाभोवती यंदाच्या वर्षी श्रावणात शनीवारीच सकाळी 11 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास काशी येथून (उत्तर प्रदेश वाराणशी) गंगाजल प्रकटले.

जेऊर येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिरात पुरातन कालापासून दर तीन वर्षांनी श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी अखंड शिवलिंगाभोवती काशी येथून गंगाजल प्रकट होत असल्याची आख्यायिका आहे. परंतु यंदा दुसऱ्या श्रावण सोमवारच्या आधीच दोन दिवस अगोदर म्हणजे शनिवारी दि 1 आगष्ट रोजी काशी येथील गंगाजलसह शंख, शिंपले, बारीक रेती लिंगाभोवती येऊन धडकले. साधारणतः या लाटेची उंची पाच असल्याचे प्रत्यक्ष दर्शीने सांगितले.
याप्रसंगी भाविकांनी दर्शनासाठी रांग लावून काशीविश्वेश्वरांच्या दर्शनासह गंगाजलचे तीर्थ म्हणून प्राशन केले. मंदिरात गंगाजल प्रकट झाल्याने जेऊर गावी भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
शिवलिंगाभोवती पाण्याचा अखंड वलय

जेऊर येथील काशी विश्वेश्वरास दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. काशीला जाऊ न शकणारे भाविक जेऊर येथे येऊन दर्शन घेतात. आख्यायिकेनुसार या मंदिरात असलेल्या काशी विश्वेश्वरांच्या शिवलिंगाभोवती अंत नसलेल्या खोलीचे अखंड पाण्याचे वलय आहे. ते वर्षानुवर्ष तसेच आहे. मंदिरातच साठ फूट खोल विहीर आहे. पण यंदा पाऊस झाल्याने विहिरीत पाणी आला आहे. जमिनीला समांतर असलेल्या गाभार्यातील लिंगात मात्र अखंड पाण्याचे वलय आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही ऋुतूत शिवलिंगाभोवती पाण्याचे वलय कायम असते, हे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

गाभार्यातील शिवलिंगाला तळ नाही. एकदा एका कुंभार नामक व्यक्तीने गाभार्यातील अखंड वलयातील स्वयंभू शिवलिंगाची खोली मोजण्यासाठी दोर सोडला. अनेक दिवस सतत दोर सोडून थकला पण लिंगाची खोली काही लागली नाही मग त्या व्यक्तीला प्रयश्चित झाला. तो देवाला शरण गेला. तेंव्हापासून आजतागायत जेऊर येथे कुंभार समाजाची व्यक्ती वास्तव्यास नाही, असे जुने जाणकार सांगतात. काशीविश्वेश्वरांच्या मंदिराशेजारी सोमलिंगेश्वर, बमलिंगेश्वर मंदिर असून, मोठ्या पाषाणाच्या शिवलिंगावर श्रींची मूर्ती आरूढ आहे.
पाण्याला उग्रवास
अखंड शिवलिंगाभोवती येणार्या पाण्याला एक प्रकारचा उग्र वास असतो. शनिवारी सकाळी अवतरलेल्या गंगाजलालाही उग्र वास होता. जुन्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार दर तीन वर्षानी श्रावणात मंदिरातील शिवलिंगाभोवती गाभार्यात जल आणि वाळूचे कण अवतरले. या गंगाजलाला उग्र वास होता. सुमारे एक मिनिटाच्या अंतरात लिंगातून पांढराशुभ्र असा वाळू आणि उग्र वास असलेले दुधी रंगाचे पाणी पूर्ण गाभार्यात पसरले. हे गंगाजल दर तीन वर्षानी अवतरते. जेऊर येथील काशिलिंग पिंडीपासून ते उत्तर भारतातील वाराणशीतील काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत भूगर्भात पोकळ मार्ग असल्याचे सांगितले जाते. त्या मार्गाद्वारे उत्तर काशी वाराणसीतून दक्षिण काशी जेऊर येथील स्वयंभू शिवलिंगात गंगाजल अवतरते, अशी भाविकांची भावना आहे.

चौकट
श्रावणाच्या महिना असल्याने मुलगा मंदिरात असताना अचानक शिवलिंगातून पाणी अवतरले. दर तीन वर्षांनी काशीलिंगातून गंगाजल अवतरले.शंख, शिंपले, वाळू लिंगाभोवती अवतरले होते असे पुजारी संजयकुमार गुरव यांनी सांगितले.