सिल्वर ओक वरील सहा जणांना कोरोनाची लागण…..!
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक वरील सहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हे सहाजण शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षक असल्याची प्राथमिक माहिती सामोरं येत आहे.
सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचाऱ्यांची नुकतीच कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये या सहा सुरक्षा रक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर काहीजणांचे अहवाल प्रलंबित आहेत. सध्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सर्व सुरक्षारक्षकांना सध्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

सुदैवाने शरद पवार गेल्या काही दिवसांत पॉझिटिव्ह आलेल्या सुरक्षारक्षकांच्या संपर्कात आले नव्हते. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस शरद पवार यांनी कोणालाही न भेटण्याची शक्यता आहे. कालच शरद पवार बारामतीला जाणार होते. मात्र, ऐनवेळी शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.


शरद पवारांची होणार कोरोना टेस्ट ?

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरील सर्व स्टाफच्या कोरोना टेस्ट केल्या गेल्यात. मात्र स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा कुटुंबातील कुणीही कोरोना टेस्ट केल्याचं अधिकृतरित्या समोर आलेलं नाही. मात्र शरद पवारांच्या सर्व स्टाफच्या टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. आता कर्मचाऱ्यांना आपल्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. दरम्यान सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे.
मातोश्रीवरही कोरोना :
याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानबाहेरील पोलिसांना त्याचसोबत रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या अंगरक्षकांना देखील कोरोना झाल्याची घटना घडली आहे.