श्रावणमास प्रवचनमाला :संत तुकाराम महाराज धनवान आणि दयावन हो होते-जयवंत बोधले महाराज
दिनांक : ८ऑगस्ट; सोमवार
श्रावणमास प्रवचनमाला
प्रवक्ते: गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले
विषय : संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान
श्रीभगवंत मंदिर, बार्शी.

अंकिता धस
बार्शी: पवित्र श्रावण महिना ; श्रावणी सोमवार आणि याच योगावर आलेली पुत्रदा एकादशीच्या दिवशी गुरुवर्य डॉ. जयवंत महाराजांच्या सुश्राव्य वाणीतून ११व्या दिवशीचे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा व्यावसायिक दृष्टीकोन असलेले चिंतन ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले.

दूकानदारीच्या व्यवसायात जम बसलेल्या संत तुकाराम महाराजांचा अर्थकारणाबरोबरच समाजशास्त्रचा चांगला समन्वय साधला गेला. गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज प्रतिपादन करतात की, समाज या शब्दातील स म्हणजे संस्कारमय आचरण, सहनशील मनोवृत्ती आणि समन्वयक बुद्धि माणसाच्या अंगी असली पाहिजे. समाज शब्दातून स हे अक्षर बाजूला काढता…. तसे माजून न जाता, दयावान वृत्तीने माणसाचे आचरण असावे.
संत तुकाराम महाराजांच्या अर्थशास्त्रात धर्मप्रवृत्ती,संपत्ती आणि सुख या ३ ही गोष्टी महत्वपूर्ण मानल्या जातात. सात्विकता आणि साधनेचे अनुष्ठान हीच खरी धर्मप्रवृत्ती होय.
“कोणाही जीवाचा
न घडो मत्सर।”
याप्रमाणे संत तुकाराम महाराज कुटुंबातील तसेच गावातील इतर लोकांना मोठ्या आदराने बोलत असत. तुकाराम महाराजांच्या याच कटाक्ष नितीमूल्यांमुळे त्यांना पुष्कळ संपत्ती व्यवसायातून मिळाली. त्यांना मिळवलेल्या या पैशाच्या सुखप्राप्तीतून शांत झोप लागत होती. परंतु, सध्याच्या काळातील वस्तुस्थिती पाहता मात्र, ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना शांत झोप नाही. पैसा कमविताना दु:ख आहे, तो मिळवलेला पैसा सांभाळताना दु:ख आहे आणि तो मिळवलेला पैसा खर्च करतानाही दु:ख आहे. या तीनही गोष्टी जर मर्यादित असतील तर मात्र सुख होईल.
याबाबत महाराजांनी विविध प्रमाणांचा संदर्भ देत संत तुकाराम महाराजांच्या व्यवसायातील आदर्श सर्वांसमोर ठेवला. पैसा जरुर कमवा. कारण, त्यास समाज मान्यता आहे. हे सर्वजण माझ्याजवळ पैसा आहे म्हणून माझ्याकडे प्रेमाने पाहतात, हे खर आहे.दु:खदहीआहे.तेव्हा,आपल्याकडील पैशाचा योग्य विनियोग झाला तर ते सुखद आहे.
गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज पुढे संत तुकाराम महाराजांचे मानसशास्त्र समजावून सांगताना, गुरुदेव रानडे यांचा विचार स्पष्ट करतात-वैद्य हा चांगल्या मनाचा असावा.*एखादा वकिल हा चांगल्या मनाचा असावा, एखादा शिक्षक चांगल्या मनाचा असावा. अगदी त्याचप्रमाणे, जो धनवान आहे, तो मनाने दयावान असायला हवा. हे वैशिष्ट्य संत तुकाराम महाराजांच्या ठायी दिसून येते.