सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील एका 24 वर्षीय शिकाऊ डॉक्टराने हॉस्टेलमधील त्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, कौटुंबिक तणावामुळे तो मागील काही दिवसांपासून ड्रिपेशनच्या गोळ्या घेत होता, असे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. औदुंबर मस्के यांनी सांगितले.

चैतन्य अरुण धायफुले (वय वर्षे 24 ) राहणार- तेलंगी पाच्छा पेठ सोलापूर असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे .चैतन्य धायफुले हा सिव्हिल हॉस्पिटल मधील कोरोना वॉर्डात काम करीत होता.
सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये रात्री आठ ते पहाटे दोन वाजेपर्यंतची ड्यूटी करुन चैतन्य धायफुले हॉस्टेलमधील त्याच्या खोलीवर गेला. त्यानंतर सकाळी त्याच्या मित्राने जेवणाचा डबा आणण्याच्या निमित्ताने चैतन्य यांना फोन केला. मात्र, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.


त्यानंतर मित्राने चैतन्य याच्या भावाला कॉल करुन त्याच्याबद्दल विचारणा केली. मात्र, भावाच्या फोनलाही चैतन्यने उत्तर दिले नाही. त्यानंतर ते दोघेही चैतन्य याच्या रुमवर पोहचले. त्यावेळी त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा वाजवला आणि आवाजही दिला. मात्र, त्याने दरवाजा उघडत नाही म्हटल्यावर भावाने दरवाजा तोडला. त्यावेळी खोलीत त्याचा मृतदेह लटकत असल्याचे पहायला मिळाले, असेही डॉ. मस्के म्हणाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून हॉस्पिटलमध्ये त्याचे नातेवाईक आले होते. तत्पूर्वी, पोलिसांनी पंचनामा करुन घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे.
कौटुंबिक तणावातून केली आत्महत्या
चैतन्य अरुण धायगुडे या शिकाऊ डॉक्टरने कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याचे सिव्हिल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलीस आता सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.