जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांना ही कोरोनाची बाधा
पंढरपूर :पंढरपूर तालुकाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासात भगीरथाची भूमिका असलेल्या जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांची प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थनेची गरज असल्याची फेसबुक पोस्ट त्यांचे नातू आणि आम.प्रशांत परिचारक यांचे चिरंजीव डॉ. प्रीतिश परिचारक यांनी टाकली आहे.

त्याच बरोबर परिचारक कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे आणि त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वृत्त असल्यामुळे पंढरपूर तालुक्यात अस्वस्थता पसरली आहे. प्रत्येक नागरिक चिंतीत होऊन परिचारक कुटुंब कोरोनामुक्त होऊन सुखरूप परत यावे यासाठी प्रार्थना करीत आहेत. पांडुरंग परिवारातील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते या आपल्या कुटुंब प्रमुखांवर आलेल्या संकटामुळे हवालदिल झाले आहेत. मोठे मालक ओसरीत बसलेले पहायचे आहेत, विठ्ठला तूच आता मदत करु अशा प्रकारच्या आर्त भावना व्यक्त करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात फिरू लागल्या आहेत.

डॉ.प्रीतिश परिचारक यांची फेसबुक पोस्ट
तालुक्यातील जनता मोठ्या आदराने मोठे मालक म्हणून ज्यांचा उल्लेख आदराने करत असते, ते जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांनाही कोरोना लागण झाली असून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाढलेले वय, शुगर, रक्तदाब आणि कोविड न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांच्यासाठी प्रार्थनेची गरज आहे, असे आवाहन करणारी फेसबुक पोस्ट डॉ. प्रीतिश परिचारक यांनी केली आहे.
ती पोस्ट पाहिल्यानंतर कार्यकर्ते चिंतीत झाले आहेत. अनेकांनी आपापल्या श्रद्दास्थानाकडे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.