बार्शी : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या 2021-22 मधील पीक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. खरीप उडीद पिकाच्या स्पर्धेत बार्शी तालुक्यातील पिंपरी येथील शेतकरी संतोष काटमोरे यांचा राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे.त्यांनी एका हेक्टर मध्ये 44 क्विंटल 14 किलो उत्पन्न घेतले आहे.त्याना 50 हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी दिली.

राज्यात जसे खरीप पीक क्षेत्र वाढत आहे, तसेच सोलापूर जिल्ह्यातही खरीप क्षेत्र दरवर्षीच वाढत आहे. कडधान्य, तृणधान्याची देशाला असलेली गरज लक्षात घेता उत्पादकता वाढविण्यासाठी पीक स्पर्धा घेतली जाते. अधिकाधिक उत्पन्नातून चार पैसे तर शेतकऱ्यांना मिळणार आहेतच, शिवाय बक्षिसाचा मानही मिळत आहे.
संतोष काटमोरे यांचा प्रथम तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवटे येथील शेतकरी राजकुमार हलकुडे यांनी 31 क्विंटल 56 किलो उत्पन्न घेतले आहे. त्यांना 40 हजार रुपये तर तृतीय क्रमांक आलेल्या राजेवाडी तालुका जामखेड या 30 क्विंटल 30 किलो उत्पन्न घेतलेल्या महिला शेतकऱ्यांना 30 हजाराचे बक्षीस जाहीर झाले आहे.

संतोष काटमोरे यांनी एक एकर क्षेत्रात निर्मल उडीद पेरणी केली होती.या उडीदाला त्यांनी चार फवारण्या घेतल्या होत्या.
उत्पादनातही वाढ होण्याच्या उद्देशाने पीक स्पर्धा घेतल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात तर खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी या स्पर्धा घेतल्या जातात.


राज्याच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा १५ पट किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादन आलेल्या शेतकऱ्यांनापीक स्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजले जात आहे.
कोट
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल. तसेच शेतकरी अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
बाळासाहेब शिंदे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
