प्रापंचिक जीवनामध्ये दुर्मिळ असलेले धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही गुण संत तुकाराम महाराजांच्या अंगी होते-जयवंत बोधले महाराज
अंकिता धस
बार्शी: प्रापंचिक जीवनामध्ये दुर्मिळ असलेले धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही गुण संत तुकाराम महाराजांच्या अंगी दिसताना संत तुकाराम महाराजांची भाषा आहे-
“बरे झाले देवा निघाले दिवाळे।”
या प्रमाणाप्रमाणे समाजातील प्रापंचिक तत्वज्ञानाचे अधिष्ठान संत तुकाराम महाराजांच्या अंगी होते. यातून हे स्पष्ट होते की, पैसा जरुर कमवावा पण, त्यामध्ये तत्वाचे अधिष्ठान असावे लागते असे विवेचन ह.भ.प. गुरुवर्य जयवंत बोधले महाराज यांनी केले.

येथील भगवंत मंदिरात संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान या विषयावर सुरू असलेल्या श्रावणमास प्रवचन मालेत ते बोलत होते.प्रवचनाचा आजचा 12 वा दिवस आहे.
वेतन जरुर घ्या.परंतु, त्यात उचितपणा दिसून आला पाहिजे.अनिष्ठ मार्गाने मिळालेला पैसा अखेरीस दु:खच देतो. यावेळी, गुरुवर्य डॉ. जयवंत महाराजांनी सध्याच्या नोकरदार वर्गाबाबतची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. हे विचार सांगताना ,युवक श्रोतावर्ग मोठ्या कुतूहलाने ऐकत होता.

व्यवसायातून जसा विविध मार्गाने पैसा येतो, तसा तो विविध मार्गाने जातही असतो. ज्याला या व्यवहारातील येणे आणि देणे कळते, त्याचा प्रपंच उत्तम असतो.ज्याचा प्रपंच उत्तम असतो;त्याचा परमार्थही उत्तम असतो. हे अनेक दृष्टांताद्वारे गुरुवर्य डॉ. जयवंत महाराजांनी भाविकांना समजावून सांगितले.
संत तुकाराम महाराजांचा प्रपंच उत्तम चालू आहे, हे पाहता बोल्होबा-कनकाई या दोघांमध्ये तुकाराम महाराजांच्या विवाह विषयी बोलणे झाले. कनकाईने आपल्या भावाची मुलगी रुक्माईशी विवाह करण्याचे ठरविले. संत तुकाराम महाराजांचा मामाच्या मुलीशी विवाह संपन्न झाला. रुक्माई फार गुणवान, सुस्वभावी, पतीची आज्ञा प्रमाण मानणारी, घरातील सर्वांशी प्रेमाने वागणारी होत्या. सासू-सूनेच्या पलीकडे कनकाईने- रुक्माईचे नाते निर्माण झाले होते. परंतु, अचानकपणे एके दिवशी रुक्माईंना दम्याचा त्रास सुरु झाला. व हा दम्याचा त्रास काही थांबेना. म्हणून, संत तुकाराम महाराजांचे दुसरे लग्न केले.
संत तुकाराम महाराजांची दूसरी पत्नी म्हणून जिजाई बरोबर संसार सुरु झाला. पुत्र, सून, धनसंपत्ती आणि सौभाग्यवतींनी युक्त असलेल्या या घरात आता कोणतीही उणीव नव्हती.
महिपती महाराजांनी लिहलेल्या चरित्रात बोल्होबांच्या चित्ताची अवस्था मिळणे आणि न मिळणे अशी झाली होती. गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज यातील तात्विक चिंतन मांडताना सांगतात की, चित्ताला सुख किंवा दु:खाचा स्पर्श होत नाही, अशी अवस्था म्हणजे ‘विरक्ती’ होय.
अज्ञानी म्हणतो मी हे केले , म्हणून तो त्या कर्मबंधनात अडकतो. आणि ज्ञानी म्हणतो मी नव्हे ;हे परमात्म्याने केले हीच खरी परमभक्ती होय.संसारामध्ये एकमेकांना समजून घेणे, प्रेमाने व्यवहार करणे, एकमेकांवर विश्वास ठेवणे या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, असेही डॉ. जयवंत महाराज म्हणाले.