वैराग नगर पंचायत निवडणुकीत दणक्यात विजय मिळविणाऱ्या निरंजन भूमकरांच्या कौतुकासाठी आमदाररोहितदादापवार पोचले वैरागमध्ये…
वैराग : (ता.बार्शी जि. सोलापूर) नगरपंचायतीच्या निवडणुकीत दणदणीत यश मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविणारे निरंजन भूमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आमदार रोहितदादा पवार यांनी काल वैरागमध्ये जाऊन कौतुक केले. नूतन नगरसेवकांचा सत्कार करून भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा शब्दही आमदार रोहितदादा पवार यांनी या वेळी दिला.

नव्याने अस्तित्वात आलेल्या वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ जागांपैकी १३ जागा निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत. त्याबद्दल आमदार रोहितदादा पवार यांनी वैरागमध्ये जाऊन नूतन नगरसेवक आणि भूमकरांचा सत्कार केला.

या वेळी वैरागची आगळी वेगळी परंपरा म्हणून भूमकर आणि रोहितदादा पवार यांना खांद्यावर बसवून मिरवणूकही काढण्यात आली. नूतन नगरसेवकांचा सत्कार करून वैराग शहराच्या विकासासाठी चांगलं काम करण्याच्या शुभेच्छाही दादांनी दिल्या.
आमदार रोहितदादा पवार म्हणाले की, निरंजनभाऊ तुमच्या सर्वांच्या हिताची कामे व्हावीत, यासाठी मंत्रालयात सतत पाठपुरा करण्यासाठी धडपडत असतात. आताची त्यांची धडपड वाया जाणार नाही, यासाठी त्यांच्या पाठीशी ताकद उभा करू. तसेच बंद असलेला संतनाथ साखर कारखाना आपल्या बार्शी तालुक्याचा आहे. तालुक्यातीलच लोकांनी तो चालवावा. हा कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचा कसा राहील, यासाठी प्रयत्न करू. तसेच बार्शी तालुक्यातील रस्ते , वैराग ग्रामीण रुग्णालय, स्वतंत्र बाजार समिती आदी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दादांनी दिले.