बार्शी : येथील सुलाखे हायस्कूलचे उपमुख्याध्यापक व सध्या मुख्याध्यापक पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळत असलेले श्री स्वामीराव पांडुरंग हिरोळीकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
सुलाखे हायस्कूलने २०१९-२० मधील शासकीय नियमानुसार, शाळांना सेंट्रल कीचन मार्फत धान्य, तांदूळ शिजवून देण्यासाठी विशिष्ट कंत्राटदाराला मान्यता दिलेली आहे.

सुलाखे हायस्कूल ही मोठी शाळा असल्यामुळे, तेथील विद्यार्थी संख्याही प्रचंड आहे. त्यातच २०२१-२२ वर्षात कोविडमुळे शाळा झाली नसल्याने तांदूळ शिजवून देणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्या काळातील सुमारे सतरा टन इतका अनुशेषीत तांदूळ आता वाटप करण्यासाठी शाळेकडे आलेला आहे.
यापूर्वी शाळेने हरभरा, मूग डाळ धान्याचे वाटप केले होते, त्यावेळेसच्या अनुभवांनुसार यासाठी अनेक वर्ग गुंतून पडतात, आणि त्यासाठी शिक्षण देणे थांबवून सर्व वर्गशिक्षकांना त्यातच गुंतून पडावे लागते. याच गोष्टीचा शाळेला मनस्ताप होत असल्यामुळे हिरोळीकर सरांना ‘विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं की तांदूळ?’ हा प्रश्न पडला आहे.
शिक्षण प्रशासनाला नम्र विनंती आहे की, जर हे सेंट्रल कीचन कंत्राटदार तांदूळ शिजून देऊ शकत असतील, तर आत्ता तांदूळ वाटपही त्यांच्यातर्फे व्हायला पाहिजे. तांदळाचा साठा त्यांच्याकडे पाठवला आणि आमच्या वर्ग शिक्षकांकडून त्यांना विद्यार्थ्यांची यादी गेली किंवा आमच्या शाळेचा शिक्का असलेले कूपन दिले गेले तर त्यांना तांदूळ वाटप करणे अतिशय सोयीचं होईल. यामुळे धान्य वाटप व्यवस्थित होईल, वाटपात सुसूत्रता येईल. आणि शाळेच्या शिक्षण प्रक्रियेतही अडचण येणार नाही. त्यामुळे याबद्दलची योग्य ती कार्यवाही आगामी काळापासून व्हावी अशी माझी नम्र विनंती आहे.
-श्री स्वामीराव पांडुरंग हिरोळीकर, उपमुख्याध्यापक, सुलाखे हायस्कूल, बार्शी.