
बार्शी : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने सध्या बेमुदत संप सुरु असल्याची माहिती बार्शीचे तहसिलदार सुनिल शेरखाने यांनी दिली.
राज्यातील महसूल विभागात महसूल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून, एका महसूल सहाय्यकांकडे दोन ते तीन संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कर्मचारी प्रचंड तणावात असून, महसूल सहाय्यक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील भरती झालेली नाही. अव्वल कारकून व मंडळाधिकारी संवर्गातून, नायब तहसिलदार संवर्गातील पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात मागील दीड ते दोन वर्षापासून प्रलंबित असल्याचे दिसून येते. तसेच शासन निर्णय महसूल व वन विभाग दि. १० मे २०१९ अन्वये नायब तहसिलदार संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार अव्वल कारकून व मंडळाधिकारी यांच्या सेवा जेष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्रक काढलेले आहे. परंतु अव्वल कारकून व मंडळाधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे, त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याने, सदरचे पत्रक तात्काळ रद्द करावे, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना दि. ४ एप्रिल २०२२ पासून बेमुदत संपावर आहे.
संपामुळे कार्यालयात त्यांची अनुपस्थिती असल्यामुळे, काही प्रमाणात नागरिकांची कामे रखडलेली आहेत, दिरंगाई होऊन अडचणी येत आहेत. आम्ही शक्य होईल तितके काम करण्याच प्रयत्न करत आहोत.
सुनिल शेरखाने, तहसिलदार, बार्शी