दिनांक : १५ ऑगस्ट; सोमवार
श्रावणमास प्रवचनमाला
प्रवक्ते: गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले
विषय : संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान श्रीभगवंत मंदिर, बार्शी.
मृत्यूसमीप जाऊन झालेला अनुताप ही वैराग्याची पहिली पायरी आहे-जयवंत बोधले महाराज
बार्शी; संत तुकाराम महाराजांना प्रपंचात काही केल्या यश येत नव्हते. म्हणून, ते शेवटी उदास झाले. त्यांना काय करावे कळेना. उदासी वृत्तीने ते एकांतात बसले.
महिपती महाराजांनी वर्णन केले आहे-
दारापुत्र होताशी नाश।
हा अनुताप झाला तुकयास।
संत तुकाराम महाराजांना या संसाराचा वीट आला होता. त्यांना, पश्र्चाताप होऊ लागला. अनुताप होऊन ते स्तब्ध झाले. हा अनुताप म्हणजे, नित्य मृत्यू जाणे समिप अशी अवस्था तुकाराम महाराजांची झाली होती. असे गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी सांगितले.

उदास शब्दाचा अर्थ सांगताना महाराज म्हणतात उद्+ अस= उदास
अर्थात, ‘उद्’ म्हणजे उंच आणि ‘अस’ म्हणजे असणे. म्हणजेच ज्यांची मनोवृत्ती एका विशिष्ट उंचीवर गेलेली आहे, असा उदास.
नाथांच्या चिरंजीवपद या ग्रंथात अनुताप शब्दाचा अर्थ सांगताना महाराज म्हणतात – “नित्य मृत्यू जाणे समिप” म्हणजेच जो मृत्यूला पाहतो त्याला अनुताप झालेला असतो. अनुताप ही वैराग्याची पहिली पायरी आहे.

सर्वसाधारणपणे, मनुष्याला सर्वात जास्त भय हे मृत्यूचे असते. हा मृत्यू ज्याला कळला आणि त्यानंतर जी अवस्था होते. त्याला अनुताप असे म्हटले जाते. हीच अवस्था तुकाराम महाराजांची झालेली आहे. तुकाराम महाराजांच्या चित्ताने आता अनुताप धारण केलेला आहे. महिपती महाराज या अनुषंगाने म्हणतात, मज दारोदारी संसार जुळवाजुळव। एक संसारातील गोष्ट संकटातून बाजूला काढली की ,पुढे लगेच दूसरे संकट उभे राहते. या संबंधात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विश्रांती नाही कोठे। कितीही प्रयत्न केला तरी संसारातून दु:ख काही कमी होत नाही पुढे वाढतच जाते.जसा एखादा कोळसा घासाला तरी तो अधिकच काळा दिसतो. अशी अवस्था तुकाराम महाराजांची झाल्यावर तुकाराम महाराज घराबाहेर पडतात. सर्व गोष्टींचा त्याग करुन भावनाथाच्या डोंगरावर जाऊन बसतात. डोळे मिटून भगवंत नामस्मरण करत देवाला प्रार्थना करतात. देवा मला तुझे ध्यान कसे करायचे हे ज्ञात नाही. तेव्हा तू माझ्याकडून करुन घे.
मनाने डोळे झाकून पांडुरंगाचे चिंतन करतात. गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज म्हणतात की, मन एकाग्र होणे हा जगातला सर्वात मोठा विजय असतो. आपल्या मनाचा आपल्या मनालाशीच संवाद एकांतात व्हायला हवा. आत्मचिंतन होणे महत् कठीण आहे.
सलग ७ दिवस संत तुकाराम महाराज नामचिंतनात व्यग्र आहेत. महाराजांची ही साधना पाहून साक्षात पांडुरंग परमात्मा सापाचे रुप धारण करुन येतात. तेव्हा, हे तुकाराम महाराजांना मनामध्ये दृष्टांताने कळते. संत तुकाराम महाराजांचा मनाशी मनाची संवाद चालू आहे. हीच खरी साधना असते.तुकाराम महाराज म्हणतात, या सापाच्या रुपात तुझे मला दर्शन नको देवा. मी ज्या रुपात तुझे चिंतन केले अगदी तसा प्रगट हो. भक्ताच्या भावे भुलला पांडुरंग परमात्मा महाराजांच्या समोर तात्काळ शंख, चक्र, गदा पद्मधारी रुपात प्रगट होतात.हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना मिळालेला पहिला पांडुरंगाचा सगुण साक्षात्कार होय.
तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून अश्रू येतात. दोघे एकमेकांकडे बघत सुखसंवाद करत असतात.तुकाराम महाराजांच्या घरी मात्र आता कान्होबाला चिंता वाटू लागली. कुठे गेला माझा तुका? सगळीकडे शोधाशोध चालू आहे त्याची. भगवान पांडुरंगाला विचारतात, तुका मी आलोय ना… मग माग काहीतरी. मी देईल ! तू म्हणेल ते देईल!!
तुकाराम महाराज एकच मागणे मागतात – हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा। मी तुझ्यापासून दूर कधीही जावू नये . हेच एक मागणं आहे. तेवढ्यात कान्होबा तिथे येतात. त्या दोघांना पाहतात. कान्होबाला तुकाराम महाराजांचे फार अप्रूप वाटू लागते. तुका, म्हणून हाक मारतात तोच भगवान पांडुरंग लुप्त होतात. कान्होबा नंतर तुकाराम महाराजांना घरी घेऊन जाण्यासाठी डोंगरावरुन परतीच्या वाटेला लागतात.