ग्लोबल न्यूज – राज्यात आजही कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. आज रविवारी दिवसभरात 9,926 रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. तर 24 तासांमध्ये 9,509 नवे रुग्ण सापडले. आज 260 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 3.53 एवढा आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 4 लाख 41 हजार 228 एवढी झाली आहे.

राज्यात सध्या 1 लाख 48 हजार 537 सक्रिय रुग्ण असून यामधील सर्वाधिक केसेस पुण्यात आहेत. पुण्यात सध्या कोरोनाचे 44 हजार 201 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत 2 लाख 76 हजार 809 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 62.74 टक्के इतका झाला आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसते. मात्र महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हा देशात कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे देशभर चिंता व्यक्त केली जात होती. आता मात्र सकारात्मक परिणाम दिसत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण हे आता 78 दिवसांवर गेलं आहे. हे प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढा विषाणूचा प्रसार कमी होत असल्याचं म्हटलं जातं.
नवे रुग्ण वाढण्याचा दर हा आता 0.90 टक्के एवढा खाली आला आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईतल्या 24 पैकी 4 वॉर्डांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर हा 100 दिवसांपेक्षाही जास्त झाला आहे. तर 2 वॉर्डांमध्ये तो 90 दिवसांवर गेला आहे.
तर 6 वॉर्डांमध्ये तो 80 तर इतर 5 वॉर्डांमध्ये तो 70 दिवसांवर गेला आहे. मुंबईतल्या 24 वॉर्डांमधल्या 18 वॉर्ड्समध्ये रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण हे आता 1 टक्क्यांपेक्षाही कमी झालं आहे.
सध्या राज्यात 9 लाख 25 हजार 269 जण होम क्वारंटाइन असून 37 हजार 944 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.