थकलो आहे पण थकून चालणार नाही;लढतो आहे लढतच राहणार
वाचा कोरोना संघर्षाची कहाणी पत्रकाराच्या अनुभवातून; सांगताहेत आनंदकुमार डुरे-पाटील
कोरोनाच्या महामारीने गेल्या दीड वर्षात सर्वत्र हाहाकार पसरला असताना सतत कार्यरत असून आता मात्र थकलो आहे पण थकून चालणार नाही याची जाणीव झाली आहे . या कोरोना महामारीच्या काळात लढतो आहे आणि शरीरात त्राण आहेत तोपर्यंत लढतच राहणार आहे .

पहिल्यांदा सांगतो आपल्या आई वडिलांनी भलेही आपल्यासाठी इस्टेट कमवून ठेवली नसली तरी संस्कार मात्र एवढी दिले आहेत त्या संस्काराची शिदोरी आपण मरे पर्यंत आपल्या कामी येणार आहे .
2019 मध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पुराने थैमान घातले होते . यावेळी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . जयवंत गुंड वैराग मधील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. चव्हाण ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जोगदंड मान्यवरांच्या माध्यमातून तीन लाख 60 हजार रुपयांची औषधे कोल्हापूर – सांगली भागातील आपल्या बांधवांना सहकारी किरण आवारे, निलेश उबाळे , गणेश अडसूळ यांच्या सोबत त्या ठिकाणी जाऊन पोहच केली .
दुर्देवाने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये मार्च -एप्रिल दोन हजार वीस मध्ये कोरोना ने आपले पाय पसरायला सुरुवात केली 22 मार्च 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता . त्यानंतर 24 मार्च 2020 रोजी पासून संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन करण्यात आला .या वेळेपासून लढत आहे आणि लढत राहणार आहे . 26 मार्च दोन हजार वीस पासून सहकारी मित्र शशिकांत भंगूरे , पोलीस कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे आणि सहकार्यानी विचार केला की रोजीरोटी वर असणाऱ्यांच्या पोटाचं काय ? म्हणून सव्वीस मार्च दोन हजार वीस पासून चोपण कुटुंबातील सदस्यांना सुमारे तीन महिने वैराग मधील गरजवंतांना दोन वेळेचे जेवण पुरवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला .
इथून चालू झाली कोरोना विरुद्धची लढाई ,कोण पॉझिटिव्ह आले , कोणाच्या घरातील खूप पॉझिटिव्ह आले तर गल्लीने वाळीत टाकले ,कुणाला जेवण मिळेना , कुणाला बेड मिळेना .याचबरोबर वैराग मध्ये covid-19 केअर सेंटर सुरू करणे. चौकातील पोलीस कर्मचाऱ्यांना चहा- नाश्ता देणे हे सतत चालूच आणि चालत आहे . थांबलो नाही करत राहिलो. वैराग मध्ये पहिला पेशंट सापडला बार्शी रोडचा. त्यांच्या दुकानाकडे आणि त्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदलला. त्यांना मानसिक आधार देण्याचे काम केले .आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सकाळच्या चहा पाण्याची व नाश्त्याची सोय एसटी कॅंटीनचे अरुण बंडेवार यांच्यामार्फत केली तर कोरोना योद्ध्यांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्याचे काम प्रवीण काकडे ,छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती आदिंच्या माध्यमातून केलं.
कोण पॉझिटिव्ह आलं तर त्याला समजवण्याचा काम वैद्यकीय अधिकारी डॉ. गुंड यांनी आमच्या सोपवलेले. मानसिक आधार सगळ्यात महत्त्वाचा म्हणून तेही काम करत राहिलो. विजापूरहून चालत आलेल्या बोर गाडी वरील 22 ते 25 जणांचे जेवणाचा काम राहुल थोरात यांच्या माध्यमातून केलं तर मुंबईहून आलेल्या कुटुंबियातील सदस्यांचे जेवणाची सोय केली .मुंबई वरून हैदराबाद कडे निघालेल्या गाड्यांवरील पस्तीस जणांची जेवणाची सोय नागोबा चौकात पोलीस कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे , गौडगाव येथील राहुल भड यांच्या सहकार्याने केली असं करत गेलो आणि करत राहिलो .
यासर्वात एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग घडला मुंबईहून आलेले कुटुंब वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलं होतं. डॉक्टरांनी मला बोलवलं त्यांना कोरोन्टाईन करणे गरजेचे असल्यामुळे वैराग मध्ये सोय नाही . डॉक्टरांनी सांगितलं सोलापूरला जावे लागेल .तीन पुरुष, दोन महिला, दोन लहान मुली आणि एक लहान मुलगा .ज्या वेळेस त्यांना सांगितले की तुम्हाला सोलापूरला जावे लागेल त्या वेळी त्या लहान मुलांने अतिशय निरागस पणे आम्हाला विचारलं , तिथे जेवण मिळेल का ? जिथं जेवायला मिळालं तिथं पाठवा .त्यावेळी डॉक्टर आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं .मनोमन प्रार्थना केली की पुन्हा कोणावर अशी वेळ येऊ नये .त्या सर्वांच्या जेवणाची सोय शिव भोजन थाळी चालक बजरंग सातपुते यांच्या मार्फत केली .
दिवस जात होते काम करत होतो आठ ऑगस्ट 2020 रोजी भाचा अजिंक्य माने चा अकलूज वरून फोन आला . दाजींना ( प्रकाश माने ) ऍडमिट केले म्हणून . पहाटेच गाडीला स्टार्टर मारला आणि अकलूज गाठले . (घरच्यांना न सांगता ) त्यांना जाऊन भेटलो , त्याच्या बेडवर प्रत्यक्ष बसून बोललो पण आमचे दाजी खूप भित्र्या स्वभावाचे . सर्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तिथून आलो. 12 तारखेला दाजींना सोलापूरला ॲडमिट केलं मी उत्कर्ष त्यावेळी गेलो होतो. दाजी सोलापूर मध्ये ऍडमिट , भाचा अजिंक्य सोलापूर मध्ये कोरोन्टाईन तर बहीण महाळुंगच्या कोरोन्टाईन सेंटरमध्ये . पळायचे किती आणि बघायचे किती पण सगळीकडे पळत होतो.
दुर्दैवानं 15 ऑगस्ट रोजी दाजींना हृदय विकाराचा धक्का आला आणि दाजी गेले . भाचा हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा त्याला काहीतरी होईल म्हणून आणि बहीण तिकडे असताना सुद्धा तिला न सांगता त्यांना समजावत राहिलो . मानसिक आधार देत राहिलो . चार दिवसानी बहिणीला डिस्चार्ज मिळाला त्यानंतर दोन दिवसांनी भाच्याला डिस्चार्ज मिळाला . दोघांना घरी सोडलं समजावून सांगण्या पलीकडे मी काहीच करू शकत नव्हतो . या जीवघेण्या संकटात सुद्धा तन आणि मन खंबीर ठेवून काम करत होतो . एवढं सगळं असताना दररोज ऑनलाईन तास आणि बातम्याचे काम तर चालूच होतं .
दरम्यानच्या काळात वैराग नगरपंचायत व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असताना पालकमंत्री नामदार दत्ता मामा भरणे यांना भेटून निवेदन दिले तर वैराग मध्ये कोविड केअर सेंटर सुरु व्हावे म्हणून आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांना भेटलो .

यावर्षीची वारी चूकली असं वाटत असल्यामुळे 20 नोव्हेंबर 2020 रोजी पहाटेच मुलगी आणि मी आम्ही दोघेच आपल्या सर्वांचे स्फूर्ती स्थान असलेल्या रायगड वारीला गेलो .स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतलं. दुसऱ्या दिवशी 21 तारखेला स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती शंभूराजे यांच्या समाधीचे दर्शन तुळापूरला घेतलं आणि पुन्हा लढायची काम करायची ऊर्जा घेवून आलो .
हे ही दिवस जातील या आशेवर नोव्हेंबर महिना उजाडला शाळा सुरू झाल्या .तास घेण्याचं काम करत होतो. आता कुठे विस्कटलेली घडी पुन्हा बसते असं वाटत असतानाच फेब्रुवारी 2021 मध्ये पुन्हा कोरोनान डोकं वर काढलं . शाळा बंद झाल्या ऑनलाईन तास चालू बातम्या पण काम चालू .
9 मार्च 2021 तारखेला अकलूज वरून भाच्याचा फोन आला त्याच्या काकी ला ऍडमिट केले आणि रेडमी शेअर इंजेक्शन कुठे मिळते का? म्हणून चार इंजेक्शन घेवून दहा तारखेला अकलूजला गेलो . प्रत्यक्ष पेशंटला भेटून धीर दिला .अकरा तारखेला माघारी आलो . 12 तारखेला मोठा भाचा पंकज पाटील याचा भिवरवाडी वरून फोन आला त्याच्या वडिलांना म्हणजे आमचे थोरले दाजी प्रकाश पाटील यांना त्रास जाणवू लागला आहे . म्हणून रिस्क नको म्हणून 12 तारखेला संध्याकाळी दाजींना सोलापुरात ऍडमिट केले . दाजी सोलापूरला ऍडमिट , थोरली बहीण, तिची जाऊ , दिर , पुतण्या आणि सासूबाई करमाळ्यात कोरोन्टाईन . काय झाले असेल विचार करा .
दाजींची दररोज सोलापूरला दररोज खुशाली ,इंजेक्शन घेतले का – दिले काय ? गोळ्या घेतल्या का ?नाश्ता केलाय का ? दिवस यातच जात होता . 18 मार्च रोजी करमाळाला जाऊन त्या सर्वांची ख्यालीखुशाली विचारली .डॉक्टरांची भेट घेतली आणि वैरागला आलो . 20 मार्च रोजी दाजींना सोलापुरातून आणि बाकीच्यांना करमाळ यातून डिस्चार्ज मिळाला . दाजींच्या डिस्चार्जवेळी मी आणि चुलत भाऊ धीरज हॉस्पिटलमध्ये होतो .आमचा आनंद गगनात मावेना .
थोडं निवांत झाल्यासारखं वाटत असताना वैराग मधील ओळखीच्या कोणाला बेड मिळत नाही ,औषध मिळत नाही .त्यांना बेड मिळवून देण्याचं आणि औषध मिळवून देण्याचं काम करत होतो. येतील सोलापूर रोडलगत असलेल्या साई मंगल कार्यालय येथे covid-19 केअर सेंटर सुरू झालं होतं . तेथे ॲडमिट असलेल्या 50 जणांचा वेळ कसा जाणार ? याचा विचार करून वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत गुंड , पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे ,सहकारी पत्रकार आप्पा दळवी यांच्याबरोबर कोविड केअर सेंटरला भेट दिली आणि तिथे कोरोन्टाईन असलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी म्युझिक सिस्टिम चालू केली.
25 मार्च रोजी धाकटे बंधू वैभवला सोलापूरला फोन केला .थोडासा आवाज बदलल्या सारखा वाटला . त्याला विचारलं काय सर्दी झाली काय ताप आला होता काय ?तो हो म्हणाल्यावर त्याला तात्काळ वैरागला बोलून घेतलं . डायरेक्ट दवाखान्यात नेऊन त्याची तपासणी केली .तो करून पॉझिटिव्ह निघाला. सव्वीस तारखेला बार्शी नेहून त्याचा स्कोर चेक केला . स्कोर निघाला सहा .डॉक्टरांनी सांगितलं ॲडमिट करायची काही गरज नाही .घरीच कोरोन्टाईन करू म्हणून .त्याला घरीच कोरोन्टाईन केल .
काळजी लागून राहिली कोल्हापुर मधल्या मंडळींची . कोल्हापूरला आई ,भावाची मंडळी, भावाच्या तीन मुली आणि माझी एक मुलगी .त्यांना वैरागला आणायचं कसं ?हा सर्वात मोठा प्रश्न होता. दोन गाड्यांच्या पास साठी अप्लिकेशन केलं तर एकच पास मिळाला . 28 मार्च रोजी त्यांना वैरागला आणण्यात आलं .त्यांना घरी न आणता डायरेक्ट टेस्ट केली सगळेच पॉझिटिव्ह .(तसं बघायला गेलं तर आपल्याला सतत पॉझिटिव्ह यांची सवय आहे )आईचे वय 82 आणि आई पॉझिटिव खूप टेन्शन आलं आता काय करावं . डॉक्टरनी सांगितलं ॲडमिट करावे लागेल.
आईला बार्शीला घेऊन गेलो .दरम्यानच्या काळात भाऊ ,भावाची मंडळी आणि दोन मुली यांनासोलापूर रोडला कोविड केअर सेंटर मध्ये कोरोन्टाईन तर माझी एक मुलगी आणि भावाची एक मुलगी यांना घरीच कोरोन्टाईन केलं . आईला बार्शीला घेऊन गेलो तिचा स्कोर चेक केला सुदैवानं तिचा स्कोर फक्त एकच आला . तरीसुद्धा डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी सांगितलं ऍडमिट करायची गरज नाही .जीवात जीव आला .आईला घरीच कोरोन्टाईन केलं . आज सात दिवसानंतर सगळेजण बऱ्यापैकी बरे झालेले आहेत . सगळ्यांनी जवळजवळ कोरोनवर मात केलेली आहे . हे कशाचं फळ आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा फळ ( कोणाच्या मदतीला पडलोय , कोणासाठी चांगलं काम केले असं मी कधीच म्हणणार नाही )
कोरोनाच्या सुरुवातीलाच दहा 10 पी पी ईकिट घेऊन ठेवले होते त्यातल्या सातचा उपयोग केलेला आहे. तीन अद्याप गाडीच आहेत .मित्रपरिवार ,आप्तस्वकीय दुर्देवाने यांच्या अंत्यविधीला नातेवाईकांना उपस्थित राहता आले नाही मी मात्र उपस्थित राहिलो. (मुद्दामहून नावाचा उल्लेख इथे करत नाही )
या दरम्यान डॉ .जयवंत गुंड , डॉ. सुहास मोटे , डॉ .अजय सपाटे , डॉ. अतुल भिसडे – पाटील ,वैराग प्रा. आ. केंद्रातील सर्व कोरोना योध्ये , वैराग पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोनि अरुण सुगावकर , सध्याचे पोनि विनय बहिर , सपोनि महारुद्र परजने ,वैराग पोस्टेचे सर्व कर्मचारी , माझे सर्वच पत्रकार बांधव , माझ्या शाळेतील सर्व सहकारी , मेजर जगन्नाथ आदमाने , विष्णू तुपे , माझा एकदम जवळचा शाम मगर ,माझ्या दै .पुढारी मधील सोलापूर कार्यालयातील मधील सर्व सहकारी आणि ज्यांचे ऋण कधीही फेडू शकणार नाही अशी माझी अर्धांगिनी , माझा मुलगा उत्कर्ष ,मुलगी समृद्धी यांच्या बरोबरच मला सतत प्रेरणा देणारे सर्व ज्ञात – अज्ञात सहकारी मित्र या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत .
आता सांगा किती इस्टेट कमवली. किती जमीन-जुमला घेतला ? बांध , पाईपलाईन , घराची भिंत यासाठी भांडणारे बघितले आणि अनुभवले सुद्धा .पण आपण याचा थोडाही विचार न करता लढतो आहे आणि लढत राहणार आहे .शेवटी भाच्याने मला एक वाक्य सांगितलं त्याचा उल्लेख करतो आणि लिखाण थांबतो . *असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर…
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर !!!
🙏आपलाच 🙏
पत्रकार आनंदकुमार डुरे ( सर)