पुरुष वर्गाची वासना आणि त्यातून निर्माण होणारे बाईचं प्रेम वाचा…….!

0
2100

पुरुष वर्गाची वासना आणि त्यातून निर्माण होणारे बाईचं प्रेम वाचा…….!

एक विनोदी आणि विकृत विधान मी नेहमी वाचत, ऐकत आलोय. पुरुषाला स्त्रीकडून काय हवं असतं? तर, तिचं शरीर. आणि स्त्रीला पुरुषाकडून काय हवं असतं? तर, त्याचं प्रेम.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

किंवा हे वाक्य असं फिरवून सांगितलं जातं ः पुरुष शरीरसंबंध करतो वासनेसाठी, स्त्री शरीरसंबंध करते पे्रमासाठी.

किंवा भळभळीतपणे हे वाक्य असंही सांगितलं जातं ः स्त्री ही प्रेमाची भुकेली असते, तर पुरुष हा वासनेचा भुकेला असतो.

जगातलं जे तमाम लैंगिक वाङमय आहे, प्रेमाविषयीचं वाङमय आहे किंवा स्त्रीपुरुष नात्याचं वाङमय आहे, त्या सर्वांत हे विधान हमखास आढळतं. ते वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या शब्दांत लिहिलेलं असतं, एवढंच. पण ते प्रत्येक ठिकाणी मौजूद असतं हे निश्चित.

स्त्रीपुरुष नात्याचा आजवरचा सगळा इतिहास खंगाळून पाहिला तर हे अतिशय थोतांड विधान अतिशय लाडालाडाने प्रत्येक ठिकाणी सतत दिसत राहतं आणि आश्चर्य म्हणजे ते खरं मानलं जातं. आणखी आश्चर्य म्हणजे, या विधानावर आजवर कुणीही आक्षेप घेतलेला दिसत नाही. हरकत घेतलेली दिसत नाही. स्त्रियांनी त्या विधानावर आक्षेप किंवा हरकत घेण्याचा प्रश्नच येत नाही. पण पुरुषांनीही कधी त्यावर आक्षेप किंवा हरकत घेतलेली दिसत नाही. (मला वाटतं, या विधानाच्या आडून स्त्री आणि पुरुष हे आपापल्या जगण्याचं राजकारण करत असावेत.)

मी औरस, अनौरस असं लैंगिक वाङमय भरपूर वाचलंय. शास्त्र म्हणूनही आणि अशास्त्र म्हणूनही. वैचारिक आणि ललित साहित्यही भरपूर वाचलंय. त्या प्रत्येक ठिकाणी या आशयाचं विधान असतंच, की बुवा, स्त्री आणि पुरुष शरीरसंबंध करणार असतील, तर त्यात, पुरुष हा, शरीरसंबंध वासनेसाठीच करतो फक्त आणि स्त्री ही, शरीरसंबंध प्रेमासाठीच करते फक्त.

किती विचित्र विधानय! त्यातून ध्वनित असं होतं की, पुरुष हा फक्त वासनेसाठीच असतो आणि स्त्री ही फक्त प्रेमासाठीच असते. त्यातून उलट्या अर्थाने असंही ध्वनित होतं की, पुरुषाच्या अंगात प्रेम नसतं आणि स्त्रीच्या अंगात वासना नसते.

हे पटतं का?

मला तरी पटत नाही.

मी पुरुष आहे. लैंगिक जगण्याचा पुरेसा अनुभव घेतलेला आहे. मला नाही वाटत, मी आजवर जेवढाही शरीरसंबंध केला, त्यात नुसतीच वासना होती म्हणून. वासना होतीच त्यात, पण प्रेमही तेवढंच होतं. प्रेमाशिवाय वासना नाही न् वासनेशिवाय प्रेम नाही, असंच माझं जगणं होतं असं मला वाटतं. त्यामुळे पुरुषाच्या शरीरसंबंधात फक्त वासना असते न् स्त्रीच्या शरीरसंबंधात फक्त प्रेम असतं, या म्हणण्यावर माझा विश्वास नाही. वासना आणि प्रेम यांचा चांगला मेळ म्हणजे शरीरसंबंध असं मी मानतो. नुसत्या वासनेवर पुरुष जगू शकत नाही आणि नुसत्या प्रेमावर स्त्री जगू शकत नाही.

एक तर अतिशय गोड, पण अजीर्ण व्हावं असं वाक्य वाचायला मिळतं ः पुरुषांचं प्रेम हे वासनामय असतं आणि स्त्रियांची वासना ही प्रेममय असते.

वाक्य छानय, पण ते एकाच वेळी दोघांनाही लागू केलं जात नाही. त्यामुळे ते खोटं वाटतं. खोटं आहेच.

स्त्रीपुरुष शरीरसंबंधाची वर्णनं करणारे जगातले तमाम लैंगिक शास्त्रज्ञ आणि लेखक स्त्रीपुरुषांमध्ये उघडपणे अतिशय खालच्या पातळीचा भेद करतात, असंच या विधानांमधून दिसतं. त्यांच्या म्हणण्यानुसार आजच्या काळात जगायचं ठरलं, तर किती घातक विचार जन्माला येतात! प्रेमाची मक्तेदारी फक्त स्त्रीकडे असते, तर पुरुषाकडे फक्त वासनेची मक्तेदारी असते.

पुरुषाकडे मन नसतं, हृदय नसतं, संवेदना नसतात, माया नसते, स्नेह नसतो, कळवळा नसतो, भावना नसतात, चेतना नसतात, तर असतो फक्त एक लैंगिक अवयव आणि तो आयुष्यभर फक्त वासनेची कारंजी उधळत उंडारत असतो. पुरुषाला स्त्री हवी असते ती फक्त वासनेसाठी. तिच्यावर त्याला प्रेम करायचं नसतं. तिच्यात त्याला गुंतायचं नसतं. मनाने पुरुष स्त्रीची बांधिलकी मानत, पाळत नाही. त्याला ती नकोच असते.

ही वर्णनं वाचली की, पुरुष हा या जगातला माणूस वाटतच नाही. तो वाटतो फक्त वासनेचं एखादं कृत्रिम जनावर. किंवा वासनेचं एखादं स्वयंचलित यंत्र. माणसांच्या जगात त्याचा दुसरा काही उपयोग आहे असं वाटतच नाही. पुरुषाच्या माणूस असण्याचा हा विचित्र अपमान आहे असं वाटतं.

परवा एक जुन्या ओळखीची बाई भेटली. म्हणाली, पुरुषांना फक्त बाईचा देह हवा असतो. बाईचं मन पुरुषाला कळतच नाही. त्याला बाईच्या मनाचं काही घेणंदेणंच नसतं.

मी विचारलं, बाईला नको असतो का पुरुषाचा देह? बाईला कळतं का पुरुषाचं मन? पुरुषाला मन नसतं असं बाईला वाटतं का? बाईला किती घेणंदेणं असतं पुरुषाच्या मनाचं?

तमाम पद्धतांचं लैंगिक वाङमय, ललित वाङमय वाचलं की, लक्षात येतं की, बाईच्या देहाला एक अतिशय मौल्यवान वस्तू असंच मानलं गेलंय. काही एक विशेष बाब म्हणजे बाईचा देह. आणि स्त्रियांशी बोलल्यावर लक्षात येतं की, जगात बाईच्या देहाला फार म्हणजे फारच मोल आहे. फारच किंमत आहे. आणि ती फक्त पुरुषच देत नाहीत, पुरुषच फक्त तसं मानत नाहीत, तर स्त्रियाही स्वतः तसंच मानतात.

जग बाईच्या देहातच अडकलेलं आहे असं लक्षात येतं, पण त्याला फक्त पुरुषच जबाबदार आहेत असं मला वाटत नाही. पुरुष जेवढा बाईच्या देहाच्या प्रेमात असतो, तेवढीच, किंबहुना जास्तच, बाई स्वतःच्या देहाच्या प्रेमात असते. कधी कधी तर असं वाटतं की, स्त्रीकडे जगण्याचं भांडवल म्हणून फक्त तिचा देहच असतो. आपल्याच देहाच्या आधारावर ती जगते.

म्हणजे तिलाही पुन्हा माणूस किंमत नाहीच. म्हणजे घोळ असा आहे की, पुरुषाला मन असतं यावर कुणाचा विश्वास नाही, आणि बाईला मन असतं याचा कुणी विचार करत नाही. सगळा दैहिकच मामला. मनाला कुठंच थारा नाही.

बाईला प्रेम हवं असतं न् पुरुषाला वासना हवी असते, असं जे लैंगिक किंवा ललित वाङमयात म्हटलेलं असतं आणि जगातले तमाम स्त्रीपुरुषही तसंच समजतात, यात मला वाटतं, स्त्रीपुरुषांनी एकमेकांशी खेळलेलं राजकारण असावं. एकमेकांना वापरून घेण्याचं राजकारण.

पुरुष फक्त वासनेसाठी असतो असं म्हटलं की, पुरुष दिसल्यावर बाईने त्याच्या वासनेसाठी सिद्ध राहावं, अशी सूचना मिळायची आपोआप सोय होते. पुरुषाने मग वासनेच्या क्षेत्रातला काहीही अनाचार केला की, तो जगाकडून माफ व्हायला मोकळा. जाऊ द्या, तो पुरुषच आहे, पुरुषाची जातय, ती अशीच वागणार, असं म्हणून घ्यायची आयती सोय. हे त्याचं राजकारण. झालेल्या बदनामीचा गैरफायदा घ्यायची सवलत.

बाई प्रेमासाठी असते, प्रेमळ असते, ती वासनेचा विचार करत नाही असं म्हटलं की, बाईची प्रतिमा स्वच्छ राहायला त्या गोष्टीचा निश्चितच उपयोग. तिचा सहानुभूतीनेच विचार होणार. ती समजा चुकलीच काही लैंगिक क्षेत्रातलं, तर लोक म्हणणार, नाही नाही, बाईची जात अशी नसते, ती असं वागणार नाही. म्हणजे संशयाचा फायदा मिळून तिला सुटकेची सवलत. हे बाईचं राजकारण.

पुन्हा या असल्या विधानांमधून पुरुष कसा बाईपेक्षा हिणकस असतो हे दाखवायची तर आणखीनच देखणी सोय. एकमेकांना खालचंवरचं दाखवणं हा तर स्त्रीपुरुषांचा आवडीचा असा फारच पुरातन खेळ. त्या खेळाला ही असली भंकस विधानं भयंकर पूरक ठरतात.

बाईजात या विधानांचा आधार घेऊन पुरुषजातीवर बोटं रोखणं सहज करू शकते आणि पुरुषांना सतत, आयुष्यभर आरोपीच्या पिंजर्यात उभं करू शकते. पुरुषांची प्रेमाची लायकीच नसते असं म्हणू शकते. तर पुरुषजातही निगरगट्टपणे, आपण तर काय बुवा, वासनेचे बाहुले आहोत, तर वासनेचंच वागणार, हवं ते करणार, असं म्हणायला मोकळे.

आणि वर समजा बाई कधी वासनेचे काही चुकीचे खेळ करताना सापडलीच, तर पुरुषांचीसुद्धा बाईला टोकायची, हिणकस ठरवायची सोय होते की, काय गं बाई तू, बाई असूनसुद्धा असं वागलीस, बाईच्या जातीला बट्टा लावलास. प्रेम या शब्दाची किंमत कमी केलीस. बाई यासाठी जन्माला आलेली असते का? बाईचं काम तर प्रेमाचं असतं. तू असं वागून बाईजातीला नीचपणा आणलास… म्हणजे बाईला अपराधी ठरवायला पुरुष मोकळे.

प्रेम आणि वासनेच्या क्षेत्रातले अपराध करायला आणि अपराध लपवायलासुद्धा ही अशी विधानं स्त्रीपुरुष अशा दोघांनाही खूप उपयुक्त ठरतात, हे निश्चित.

माणूस म्हणून बरंच जगून झाल्यावर मला असं वाटतं की, पुरुषात प्रेम नसतं असं अजिबात नाही न् बाईत वासना नसते असंही अजिबात नाही. बाईत जेवढं प्रेम असतं, तेवढंच पुरुषातही असतं आणि पुरुषात जेवढी वासना असते, तेवढीच बाईत असते.

वासना आणि प्रेमाच्या बाबतीत स्त्रीपुरुष अशी विभागणी करणं ही खूपच मूर्खपणाची आणि चूक गोष्ट आहे. या लैंगिक आणि ललित वाङमयात वासना आणि प्रेमाची स्त्रीपुरुषात विभागणी केलेली आढळते ते ते वाङमय महाथोतांड, स्वार्थी आणि फालतू असतं असं निश्चित समजावं.

हे असं काही तरी लिहिलं गेलेलं जेवढंही काही लैंगिक वाङमय आहे, ते आधी बदललं पाहिजे. त्यातले चुकीचे निष्कर्ष बदलले पाहिजेत. आजवरच्या चुकीच्या निष्कर्षांनी जगाचं आणि मानवजातीचं खूप नुकसान केलेलं आहे आणि स्त्रीपुरुषांत उगीचच खूप खोल दर्या पाडून ठेवलेल्या आहेत.

स्त्रीपुरुषांत समानता येत नाही, एकमेकांना ते एकमेक माणूस म्हणून वागवत नाहीत, तर एकमेकांकडे वासनेची साधनं म्हणनूच पाहतात, याला कारण ही असली अतिशय घाणरेडी, पूर्ण चुकीची विधानं आपल्या वाङमयात आहेत हे आहे. ती विधानं उडवून लावल्याशिवाय जगात स्त्रीपुरुषांत बरोबरी येईल असं मला वाटत नाही.

शरीरसंबंध ही निसर्गाने मनुष्यजातीला दिलेली सुंदर आणि सुखाची गोष्ट आहे. शरीरसंबंधासारखं अंतिम सुख दुसर्या कोणत्याही गोष्टीत नाही. तर अशा सुखाचं स्त्रीपुरुषी राजकारण जगात नसावं असं मला वाटतं. या राजकारणाबाहेर पूर्णपणे निकोप, निर्मळ शरीरसंबंध स्त्रीपुरुषांत घडायला हवेत. पुरुषात प्रेम असतं की नसतं न् बाईत वासना असते की नसते, या म्हणण्यात काही दम नाही. वासना आणि प्रेम या दोन्ही गोष्टी स्त्रीपुरुषांत दोघांतही असतात आणि त्या समसमानच असतात.

प्रेमात पुरुष बाईपेक्षा तसूभरही कमी नसतो न वासनेत बाई पुरुषापेक्षा तसूभरही कमी नसते, हे नैसर्गिक सत्य आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे आणि तसंच वागलं पाहिजे. तरच माणसाचं शरीरसंबंधाचं जगणं अतिशय सुखाचं आणि आनंदाचं होईल. आपण सगळ्यांनी त्यातले भ्रम आणि गैरसमजुतींमधून बाहेर येणं नितांत आवश्यक आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here