तुकाराम दशरथ शिंदे, २० ऑगस्ट १९३४ मध्ये, सावित्री आणि दशरथ यांच्या घरी बार्शी गावात त्यांचा जन्म झाला. दोन भाऊ आणि तीन बहिणी त्यांना होते. १९३४ चा काळ म्हणजे देश पारतंत्र्यात होता. परिस्थिती हलाखीची असली तरी आईवडिलांनी मुलांना शिकवले. त्याकाळचे सातवीपर्यंतचे शिक्षण बापूंचे झाले होते.

मराठी मातीत जन्माला आल्यामुळे कुस्तीशी नात होतच. त्यावेळी कुस्तीचा आखाडाही बापूंनी चांगलाच गाजवला होता. आईवडिलांनी कष्ट, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे धन गाठीशी जमा करण्याची शिकवण दिली होती. हीच शिकवण घेऊन बापू आयुष्यभर जगले.बापू म्हणजे बार्शीचे भूमीपुत्र. बापूसाठी बार्शी फक्त त्यांचे जन्मगाव नव्हते तर त्यांची कर्मभूमी होती.

बार्शीच्या स्थानिक राजकारणातील महत्वाचा दुवा होते. राजकरणात येणार्या पाच दशकातील पिढीचे मार्गदर्शक होते. बार्शीचे चालतेबोलते विद्यापीठ होते. राजकरणात येण्यापूर्वी बापूंनी गावात आडत दुकान चालविण्याचे काम केले. सोबत शेतीचा कारभार सांभाळतच होते.
ग्रामीण अर्थव्यस्थेचा कणा म्हणून को ऑपरेटीव्ह सोसायटीची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. बापूंनी बार्शीच्या अनेक को ऑपरेव्हिट सोसायटीच्या उभारणीमध्ये मोलाचे योगदान दिले. बार्शीच्या पंचक्रोशीत अनेक सोसायटया निर्माण झाल्या होत्या.

यातीलच एक सोसायटी होती १९३६ मध्ये स्थापन झालेली दि बार्शी अर्बन को. ऑप. सोसायटी. या सोसायटीचे चेअरमन म्हणून बापूंनी वयाच्या २८ व्या वर्षीपासून कारभार हाती घेतला होता. वयाची २८ वीशीमध्ये चेअरमन पदाची घेतलेली जबाबदारी ते शेवटच्या श्वासापर्यंत केवळ त्यांच्या प्रामाणिकपणामुळे टिकून राहिली. बापूंनी गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ यासंस्थेच्या जडणघडणीसाठी दिला. वयाच्या ८६ व्या वर्षीही नियमितपणे संस्थेच्या कामात लक्ष देत होते.
संस्थेच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहणे. आलेल्या प्रत्येक अर्जावर काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेणारे व्यक्ति म्हणजे बापू. इतक्यावर्षात संस्थेच्या मीटिंगचा चहापाण्याचा खर्चही बापूंनी संस्थेच्या पैशातून न करता स्वत:च्या खिशातून केला आहे.

बार्शीच्या राजकरणात त्यांचा सहभाग कायम महत्वपूर्ण राहिला आहे. बार्शीचे उपनगराध्यक्ष पदाचा कारभार सांभाळला ते राजकरणातून समाजकारण कसे करता येईल या प्रांजळ भूमिकेतून. वयोमानानुसार प्रकृती साथ देत नसली तरी आठवणीचा ठेवा सांगत असतांना पहिलं नाव आणि आठवण म्हणजे शरद पवार साहेबांसोबत उजणी धरणाच्यावेळी सोबत केलेले कामाच्या आठवणी जशाच्या तशा त्यांच्या स्मरणात होत्या. राजकारणातील त्यांच्या गप्पा शरद पवारांपासून सुरू होणार आणि त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देतच संपणार इतकी व्यक्तिनिष्ठता बापूंची होती.

गेल्यावर्षी त्यांना बार्शी आयकॉन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हा त्यांचा जीवनगौरव होता प्रामाणिकपणे काम केल्याचा. पक्ष कोणताही असो राजकारणातील मातब्बर समजले जाणारे नेते जेव्हा बार्शीत येतात तेव्हा बापुला भेटल्याशिवाय कोणी माघारी जाईल असे कधीही झाले नाही. राजकरणातून जनहित जोपासणारी कारकीर्द बापूंची होती.
राजकरणातून समाजकारण करत असतांना बापूंनी अनेक मुलांचा शिक्षणाचा खर्च केला, गरीबांना त्याच्या मुलांचे लग्न करण्यासाठी मदत केली. कोणी आजारी असेल तर स्वत:च्या खर्चाने त्याला दवाखान्यात घेऊन जाणे आणि उपचार करणे. स्वत: आर्थिक झळ सोसली पण कोणाचे पाच पैसे कधी घेतले नाही.
लोकांना मदत करतानाही स्वत:च्या पैशातून केली. राजकारण असो, आडात दुकान असो कि को ऑपरेव्हिट सोसायटीचा कारभार असो यातील व्यवहारच एकच सूत्र होत तुकारामबापू म्हणजे प्रामाणिकपणा यावरच या सोसायटयांचा इतकी वर्ष चोख कारभार टिकून राहिला आहे.
बार्शीसाठी बापू एखाद्या सोसायटीचे अध्यक्ष किंवा गावातील ज्येष्ठ व्यक्ति नव्हते तर अनेकांचे जगण्याचे आधार होते. कोणी बापू म्हटलं आणि घरात आल तर बापूंनी त्यांना कधी रिकाम्या हाताने माघारी पाठवले नाही. शेती, कुस्ती, राजकारण आणि समाजकारण ह्या भोवती जीवन जगत असतांना कष्ट आणि प्रामाणिकपणा हे त्यांच्या जगण्याचे सूत्र होते.
राजकारण, समाजकारण करत असताना आव्हान समोर येत असतात पण या आव्हानात कधी स्वत:चा तोल ढासळू दिला नाही. आचरणात प्रामाणिकपणा कधी सोडला नाही. बापूंच्या घरावर ‘लाखात लक्ष्मी प्रसन्न भक्तास’ हे ब्रीद वाक्य रेखाटलेले आहे. ‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती’ याप्रमाणे बापूंनी प्रामाणिकपणे जीवनभर केलेल्या कामामुळे लाखात लक्ष्मी भक्तास जन्मभर प्रसन्न राहिली. या प्रसन्न मुद्रेतून शेवटचा श्वासही बापूंनी हसत हसत सोडला.
जीवन-मृत्यू मानवाच्या जीवनातील अटळ सत्य आहेत पण बापूच्या जाण्याने न भरून निघणारी पोळकी निर्माण झालीये हे दु:ख स्विकारण कठीण आहे.
शब्दांकन- सुरेश शेळके