सोशल मीडियावरील पोस्टमुळे राऊत समर्थक नगरसेवकाचा आंधळकर समर्थकांवर हल्ला; तीस जणांवर गुन्हा दाखल
बार्शी ।
बार्शी । सोशल मीडियातील पोस्टचा राग मनात धरून बार्शीतील स्थानिक शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या शहरातील देवणे गल्लीतील अन्नछत्रालयातील कार्यकर्त्यांना दहशत पसरवून मारहाण केल्याप्रकरणी आमदार राऊत गटाचे नगरसेवक अमोल चव्हाणसह चेतन चव्हाण, नाथा मोहिते, भगवान साठे, अतुल शेंडगे, रोहित अवघडे, प्रमोद कांबळे, बाबा वाघमारे(सर्व रा. लहुजी वस्ताद चौक बार्शी) व इतर अनोळखी 25 ते 30 जनावर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी चौघांना अटक केली आहे.

यातील फिर्यादी सगीर उर्फ रॉनी सय्यद हे २ मार्च रोजी रोजी रात्री ८ ते ८.३०वा चे सुमारास देवणे गल्लीतील राजमाता इंदुताई . आंधळकर अन्नछत्रालय येथे होते. त्यांच्यासह सहकारी जेवणाचे कामकाज करीत होते.५ मार्च रोजी नगरपालिकेवर घरपट्टी, नळपट्टीबाबत मोर्चा
काढणार असल्याचे लाइव्ह सांगितले होते.

याचा राग मनात धरून शहरातील त्या अमोल चव्हाण, चेतन चव्हाण, नाथा मोहिते, भगवान साठे, अतुल शेंडगे,
रोहित अवघडे, प्रमोद कांबळे, बाबा वाघमारे (सर्व रा. लहुजी वस्ताद चौक, बार्शी) व इतर अनोळखी २५ ते ३० लोकांच्या जमावाने कुकरी,गज, दांडके, काठ्यांनी सगीर यांच्यासह बापू तेलंग, बादशहा बागवान, साजिद शेख, शरद घाडगे, सूरज भालशंकर, मयुर शिनगारे यांना मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले.

तसेच अन्नछत्रालयातील भात, सांबर फेकून देऊन नासधूस केली. डिजिटल पोस्टर्स फाडून नुकसान केले आहे. दहशत निर्माण करून रिक्षात व मोटारसायकलवर बसून पळून गेले.अशी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे सोमवार पेठेत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. घटनेची माहीती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.अधिक तपास फौजदार प्रेमकुमार केदार हे करीत आहेत.