सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे हे 2 वर्षासाठी तडीपार
सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांना उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. राजेश काळे हे विद्यमान उपमहापौर व भाजपचे नगरसेवक आहेत. खंडणी सह विविध गुन्हे त्यांच्या नावावर आहेत. महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ प्रकरणेही ते बरेच चर्चेत आले होते.तसेच नगरसेवक पुत्र चेतन नागेश गायकवाड यांच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त कडूकर यांच्याकडून सांगण्यात आले.

सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी सांगितले की, आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून उपमहापौर राजेश काळे यांनी दबावतंत्र आणून शहरात शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी अनेक उद्योग केले आहेत. सर्वसामान्य नागरिकाला धमकावून खंडणी वसूल करणे, ऍट्रॉसिटीचा गैरवापर करणे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या अंगावर जाणे, सर्व प्रकारचे नियमबाह्य कामे आपल्या पदाचा गैरवापर करून करणे. यामुळे उपमहापौर राजेश काळे यांना सोलापूर शहर सोलापूर जिल्हा उस्मानाबाद व पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील तडीपार केले असल्याचे त्यांनी सांगितले.

राजेश काळे यांच्यावर सोलापूरात विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये तीन, सदरबझारमध्ये १ तर सांगवी आणि निगडी, पुणे येथे प्रत्येकी एक असे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. यात नजीकच्या नागरिकांना, व्यवसायिकांना ईजा पोहचविणे, धमकावणे, कार्यालयात घुसून हल्ला सरकारी कामात अडथळा आणणे असे शरीर आणि मालाविषयक गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक भाजप राजकारणात ते आमदार सुभाष देशमुख गटाचे समजले जातात, ते सध्या महापालिकेत नियमित कामकाजात भाग घेत होते. पोलीसांनी आज पहाटे पाचच्या सुमारास जुळे सोलापूर गॅलेक्सी अपार्टमेंट येथे जावून त्यांना ताब्यात घेतलं आणि रवानगी पुण्याच्या दिशेनं केली आहे.