ग्लोबल न्यूज – कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याने रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे समोर आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे सोपे होत आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 16 हजारांपेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. एप्रिल महिन्यात 5.60 टक्के तर , मे मध्ये 4.85 टक्के मृत्यूचे प्रमाण होते. सध्या हे प्रमाण 3.93 टक्के आहे.

दररोज कोरोनाच्या तीन हजारांच्यावर चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे मागील 10 दिवसांत 5 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. असे असले तरी पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
राज्य शासनातर्फे लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. दररोज कोरोनाचे 500 रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी तर तब्बल 822 रुग्ण आढळून आले.


सुरुवातीला 5 हजार रुग्ण होण्यासाठी 77 दिवस लागले होते. त्यानंतर 22 दिवसांत 5 हजार रुग्ण झाले. आता कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्याने केवळ 10 दिवसांत 5 हजार रुग्ण वाढले. जुलैच्या शेवटी पुण्यात कोरोनाचे 47 हजार रुग्ण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये 19 हजारांपेक्षा जास्त सक्रीय रुग्ण असतील.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी 1200 बेड्सची कमतरता भासणार आहे. त्यात 400 आयसीयू, 202 व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षता घेता 16 रुग्णालयात पुणे महापालिकेने बेडस नियंत्रित केले आहेत. 20 रुग्णालयात आणखी बेडस ताब्यात घेण्यासाठी महापालिकेचा पाठपुरावा सुरू असल्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. एप्रिल महिन्यात 5.60 टक्के तर , मे मध्ये 4.85 टक्के मृत्यूचे प्रमाण होते. सध्या हे प्रमाण 3.93 टक्के आहे