बार्शी : एखाद्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर जनजागृती करण्यासाठी भित्तीपत्रके प्रभावी माध्यम ठरतात. म्हणून वेगवेगळ्या विषयावर जनजागृती करण्यासाठी भित्तीपत्रकांच्या स्पर्धांचे महाविद्यालय स्तरावर आयोजन होणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शीच्या प्राचार्या प्रा. डॉ. भारती रेवडकर यांनी केले.

आजादी का अमृत महोत्सव अर्थात इंडीया ७५ उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एडस प्रतिबंधक व नियंत्रण केंद्र, सोलापूर यांचे मार्फत रेड रिबन क्लब, बार्शी आणि वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभाग, शिवाजी महाविद्यालय, बार्शी यांच्या वतीने “एडस नियंत्रण आणि स्वेच्छा रक्तदान जनजागृती” या विषयावर शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे आयोजित करण्यात आलेल्या भित्तीपत्रक स्पर्धेतील स्पर्धकांना मार्गदर्शन करताना प्राचार्य रेवडकर बोलत होत्या.
यावेळी ग्रामीण रुग्णालय, बार्शीचे समुपदेशक मच्छिंद्र लोंढे परिक्षक म्हणून उपस्थित होते. स्पर्धेच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. भारत बिचितकर यांनी सहभागी स्पर्धकांना स्पर्धेचे नियम समजावून सांगीतले. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे रुपये ५ हजारचे बक्षीस अक्षय बापू जाधव, द्वितीय क्रमांकाचे रुपये ३ हजारचे बक्षीस शंकर अशोक चौधरी तर तृतीय क्रमांकाचे रुपये २ हजारचे बक्षीस कु. अंकिता मनोज नलवडे हिने जिंकले. यावेळी झालेल्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोमनाथ यादव यांनी केले तर प्रा. दामाजी भिसे यांनी आभार मानले.