कार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देणारा लोकनेता- दिलीप सोपल
गेल्या चाळीस वर्षांपासून बार्शी तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात घट्ट पाय रोवून उभे असलेल्या दिलीप सोपल यांनी राजकारण व समाजकारण करत असताना जीवाभावाच्या व निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फळी गावागावात तयार केली आहे. त्यांनी एक नव्हे तर तब्बल तीन पिढ्यांसोबत काम करत आजही तरुणांमध्ये आपली क्रेझ कायम ठेवली आहे. सर्वच राजकीय पक्ष, गटतट व नेत्यांशी असलेली मैत्री, सर्वांना सामावून घेण्याची कुवत या त्यांच्या अंगी असलेल्या सर्व गुणांचा व त्यांच्यात असलेल्या कर्तृत्वाचा विचार करुन त्यांना राज्य मंत्रीमंडळात कॅबीनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तालुका हाच माझा प्रपंच या न्यायाने काम करुन कार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देणारा लोकनेता म्हणून ते कार्यकर्त्याबरोबरच जनतेत देखील गेल्या चाळीस वर्षांपासून लोकप्रिय आहेत.

माजी मंत्री दिलीप सोपल यांचा राजकीय प्रवास हा तसा थक्क करणारा आहे. वकिली व्यवसाय करीत युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेल्या दिलीप सोपल यांनी सुरुवातीला युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांच्यावर शरद पवार यांच्या विचाराचा पगडा होता. 1980 च्या निवडणुकीत अर्जुनराव बारबोले यांच्याबरोबरच प्रचारात सामील झालेल्या सोपलांना शरद पवारांनी 1985 साली समाजवादी काँग्रेसच्या चिन्हावर बार्शीची उमेदवारी दिली व पहिल्याच प्रयत्नात ते विधानसभेत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी २००४ व २०१९ चा अपवाद वगळता पाठीमागे वळून कधी पहिलेच नाही. सत्ता असो वा नसो त्यांनी कार्यकर्त्यांशी असलेले नाते कधी दुरावू दिले नाही. कायम लोकांच्या गराड्यात रहाणे हे त्यांना काही नवीन नाही.

त्यांनी आजवरच्या प्रवासात हजारो तरुणांच्या हाताला काम देत कित्येकांना नोकऱ्या लावल्या. हजारो कुटुंबे उभी केली. त्यांच्याकडे कार्यकर्ता किंवा सामान्य माणूस आला अन काम झाले नाही असे कधी झाले नाही. राजकारण करीत असताना त्यांनी जिल्हा बँकेच्या चेअरमन पदापासून ते मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष अशी अनेक पदे भूषवली, मात्र हे करीत असताना त्याचा तालुक्याला कसा फायदा होईल हे त्यांनी पाहिले. पालकमंत्री असताना विविध प्रकाराची अनुदाने त्यांनी तालुक्यातील शेतक-यांना मिळवून दिली.
पाणीपुरवठा मंत्री म्हणून काम करताना सुजल निर्मल योजनेचा साठ कोटींचा निधी त्यांनी बार्शी शहरासाठी दिला. पालिकेत दहा वर्षे सत्ता असताना नगरोत्थान योजनेसह कित्येक शेकडो कोटींच्या विकासाच्या योजना राबवल्या. शहरवासियांना मुबलक पाणी देण्यास देखील ते यशस्वी झाले. आता तालुक्याची सत्ता त्यांच्याकडे नसली तरी राज्यात त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री असलेले महाविकास आघाडीचे सरकार आहे़. त्या माध्यमातून देखील ते लोकांच्या सेवेत कायम उपलब्ध आहेत. ते आजही म्हणतात की, मी निवडणुकीत हरलो असलो तरी थकलो नाही. या वयात देखील त्यांचे राजकीय गुरु असलेल्या शरद पवारांप्रमाणे आजही ते पूर्वीच्याच ताकदीने लोकांची सेवा करतात. अशा या लोकनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच भगवंत चरणी प्रार्थना…
-राकेश तातेड, बार्शी