लग्नाला ४वर्षै झाली तरी अपत्य नव्हते…वाचा मन हेलावून टाकणारी कहाणी

0
756

लग्नाला ४ वर्षै झाली तरी अपत्य नव्हते…वाचा मन हेलावून टाकणारी कहाणी

माझ्या भावाला मोप चारपाच पोरं हाईती.त्यातला एखादा ठिऊन घेऊ. ”

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दवाखान्यापुढे एक अलिशान कार थांबली. त्यातून अभी उतरला. अभी माझा पेशंट. नेहमी तो आणि त्याची पत्नी यायचे. लग्नाला ४वर्षै झाली तरी अपत्य नव्हते.


अभीने कारच्या दुसऱ्या बाजूला जाऊन दार उघडले.आतून झगझगीत साडी घातलेली तरूणी उतरली.


दोघेही दवाखान्यात आले. तिला सर्दी खोकला किरकोळ आजार होता.तिला तपासतांना मी अभीला ही कोण असे विचारले.त्याने नंतर सांगतो आशी खूण केली. उपचार घेऊन ती बाहेर गेल्यावर अभी म्हणाला “वैद्यकाका ही तुमची नवीन सून” अभीचा काका माझा क्लासमेट.म्हणून अभीही मला काकाचं म्हणायचा. “म्हणजे ?” मी न समजून विचारले.

“म्हणजे मी कविताला घटस्फोट दिला”
“काय?” मी न राहवून ओरडलो.
माझ्यासमोर कविताचा हसतमुख सोज्वळ चेहरा आला. नेहमी अभीची काळजी घ्यायची.
“तुम्हाला तर माहीत आहे.

प्रतिकात्मकफोटो

आम्हाला मुलबाळ होत,नव्हते. कवीतेत दोष होता.तुम्हीच तर पाठवल होतना सुरूवातीला तज्ञ डॉक्टरांकडे?”
“हो पण दोष मोठा नव्हता रे. ट्रीटमेंटने फरक पडला असता ना? सर्व डॉक्टर असेच म्हणायचे ना?”
“पण किती वर्षे ? अगदी पुण्यामुंबईला पण दाखविले .पाण्यासारखा पैसा खर्च केला पण फरक पडला नाही “
“पण कविता हो म्हणाली ?” माझा प्रश्न .
“तिचं हो म्हणाली .तिचे वडील तर ऐकतच नव्हते. मी तर अगोदरच सांगितले होते पैशाचा प्रश्न नाही .

कवितेला जन्मभर पोसायची जबाबदारी माझी .शेवटी कवितेनेच वडीलांची समजूत घातली.”
तरीही माझ्या मनाला पटेना.”थोडे अजून प्रयत्न करायला हवे होते.” मी गुळमुळीतपणे म्हणालो .
“किती वर्षे ? माझही वय वाढत चालल आहे.आईलाही नातू किंवा नात हवी आहे. शेवटी केलं दुसरं लग्न .”
अभी माझी फी देऊन निघून गेला पण माझ मनस्वास्थ्य हिरावून गेला.


नंतर शिवा म्हणून हमाली करणारा तरूण आला.त्यालाही लग्नानंतर मुलबाळ होत नव्हते.त्याच्या बायकोची तपासणी केली तर तिला पाळीच येतच नव्हती .तिला सिनीयर मैडमकडे तपासायला पाठवले.ते सर्व रिपोर्ट घेऊन तो आला होता.

“काय रे.काय म्हणाल्या मैडम?”
“त्यास्नी तुम्हाला फोन कराया सांगितलं आहे जी..”
“ठीक आहे”
मी मैडमचा नंबर फिरवला.
“हैलो विवेक .” समोरून मैडम म्हणाल्या “मी तिला एक्झामीन केलं. तिची सोनोग्राफी पण केली.अरे मेन प्रॉब्लेम हा आहे की तिला युटेरसच नाही. शिवाय तिचे बाकीचे रिप्रॉडक्टीव्ह अॉर्गन्स….”


माझा चेहरा शक्यतो कोरा ठेवण्याचा प्रयत्न करत मी मैडमचे बोलणे ऐकलं
फोन ठेवल्यावर चेहर्यावरचा घाम पुसला. आता शिवाला त्याची बायको कधीही आई बनू शकणार नाही हे कसं सांगायचे या विवंचनेत मी होतो.

तेवढ्यात तोच म्हणाला
“मैडमबाईने आम्हाला समद सांगितले . देवाच्या मर्जीपुढे कोणाच चालतयं व्हय? मी हिला म्हणलो असू दे. या नशीबाच्या गोष्टी . कधीतरी देवाकडून बी व्हती चूक.माझ्या भावाला मोप चारपाच पोरं हाईती.त्यातला एखादा ठिऊन घेऊ. ” शिवा बोलत होता आणि मी सुन्न होऊन ऐकत होतो. नकळत अभी आणि शिवाची तुलना मनात झाली. पैशाने अभी नक्कीच श्रीमंत होता पण मनाच्या श्रीमंतीत तो शिवाच्या आसपासही नव्हता .मी काहीच बोलत नाही बघून शिवाने रिपोर्ट टेबलावर ठेवले.” येतो साहेब मी” म्हणून तो निघणार तोच मी त्याच्या हातावर थोपटले.त्या स्पर्शाने माझ्या भावना त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोहचल्या. तो समाधानाने हसला आणि परत जायला निघाला.

©विवेक चंद्रकांत वैद्य . नंदुरबार .(लेखाचे सर्व अधिकार लेखकाच्या स्वाधीन )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here