ग्लोबल न्यूज- भारतात 59 चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर भारतीय लष्कराने इतर संशयित अॅप्सविरोधात कठोर पावले उचलली आहेत. लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 89 अॅप्सची यादी जारी केली आहे. सैनिकांसमवेत सैन्य दलातील प्रत्येक विभागाशी निगडीत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये यापैकी एखादे अॅप असेल तर ते त्वरीत डिलीट करा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

भारतीय सैन्यदलाकडून जारी करण्यात आलेल्या यादीत टिकटॉकसारख्या चायनीज अॅपपासून ते फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्रू कॉलरसारख्या लोकप्रिय विदेशी अॅप्सचाही समावेश आहे. इतकेच नव्हे तर सैन्य कर्मचाऱ्यांना आता आपल्या स्मार्टफोनमधून टिंडर आणि कूच सर्फिंगसारखे डेटिंग अॅपही डिलीट करावे लागणार आहेत. त्याचबरोबर डेली हंटसारखे न्यूज अॅपही त्वरीत अनइन्स्टॉल करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, ज्यांच्यावर यापूर्वी वैयक्तिक डेटा चोरीचा आरोप करण्यात आला होता, लष्कराने असे अॅप्स डिलीट करण्यास सांगितले आहे. यामध्ये जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया अॅप फेसबुकचाही समावेश आहे. 2018 मध्ये केंब्रिज अॅनालिटिकाचे प्रकरण समोर आले होते.


दुसरीकडे चीनवर विविध अॅप्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशातील अतिगोपनीय माहिती चोरण्याचा आरोप केला जातो. त्याचमुळे भारतानेही टिकटॉकसह एकूण 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

भारत सरकारच्या या निर्णयानंतर हे अॅप्स गुगल प्लेवरुन हटवण्यात आले आहे. परंतु, ज्या स्मार्टफोन्समध्ये हे अॅप आधीपासून आहेत, ते सुरु राहतील. त्यामुळे भारतीय लष्कराला आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनाही असे अॅप्स डिलीट करण्याचा ताजा आदेश द्यावा लागला आहे.